औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात हिंसाचार, १० पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी; ८० समाजकंटक पोलिसांच्या ताब्यात


नागपूरः विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर नागपुरातील महाल परिसर आणि हंसापुरी भागात सोमवारी रात्री दोन गटात हिंसाचार उफाळला. घोषणाबाजी करत समाजकंटकांनी महाल परिसर, हंसापुरी आणि चिटणीस पार्क भागात तुफान दगडफेक, तोडफोड आणि रस्त्यावर जाळपोळ केली. सुमारे चार तास झालेल्या या हिंसाचारानंतर पोलिसांनी १० पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू केली आहे. या हिंसाचार प्रकरणी ८० जणांना ताब्यात घेण्यात आले असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मोठ्या संख्येने आलेल्या जमावाने महाल परिसरात तोडफोड आणि जाळपोळ केली. स्थानिक रहिवाश्यांच्या घरांवर दगडफेक केली. काही दुकानांवर तलवारींनी हल्ले केले. महाल परिसरातील झेंडा चौकात सुरू झालेला हा हिंसाचार हंसपुरीपर्यंत पसरला. हंसपुरीत समाजकंटकांनी वाहनांना आग लावली.

या हिंसाचारानंतर नागपूर पोलिसांनी १० पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू केली. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर या दहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू राहील. कलम १४४ लागू करण्यात आल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक जमावावर बंदी घालण्यात आली आहे. महाल परिसरात सध्या कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून नागपुरातील शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुख्याध्यापकांनी स्थानिक परिस्थिती बघून निर्णय घ्यावा, अशी सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

प्रशासनाने नागरिकांना खोटी माहिती आणि अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत १० पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू असेल. हिंसाचार करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे नागपूरचे पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल यांनी म्हटले आहे. या हिंसाचारानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हिंसाचारात सामील असलेल्या लोकांची ओळख पटवण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत ८० जणांना अटक करण्यात आली आहे. आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ शेअर करणारे सोशल मीडिया अकाउंट्स पोलिसांच्या रडारवर आहेत.

सोशल मीडियावर करडी नजरः बावनकुळे

नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या हिंसाचाराबाबत माहिती दिली. नागपूरमध्ये जी घटना झाली त्यात पोलिसांनाही मारहाण झाली आहे. ४८ वाहनांची तोडफोड झाली. शहर शांत ठेवणे आणि सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या, अफवा पसरवणे सगळ्यांनी थांबवावे. आम्ही प्रत्येक सोशल मीडियाच्या खात्यावर लक्ष ठेवून आहोत. काहींना ट्रॅक केले जात आहे. सध्या सरकारची भूमिका एवढीच आहे की हिंदू-मुस्लिम आम्ही एकत्र राहतो. जे समाजकंटक शहराला गालबोट लावत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे. जनतेने कोणाच्याही भावनिक आवाहनला बळी पडू नये, असे बावनकुळे म्हणाले.

‘त्या मंत्र्याला आवरले असते तर दंगल झालीच नसती!’

या हिंसाचारावर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकाराला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. ‘शांत असलेल्या नागपूरला अशांत करण्याचे काम कोणी केले, याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. गेले चार महिने सत्तेतील एक मंत्री दोन समाजामध्ये दरी निर्माण होईल, असे वक्तव्य करत आहेत. त्या मंत्र्याला वेळीच आवर घालण्याची आवश्यकता होती. कबरीचा वाद जाणूनबुजून निर्माण करण्यात आला. इतिहास तोडून मोडून पुढे आणण्याचे काम केले गेले. ४०० वर्षांपूर्वीच्या कबरीच्या प्रश्नातून काय साध्य होणार आहे? ती कबर ठेवली काय आणि नाही ठेवली काय, त्यामुळे कोणाचा फायदा होणार आहे?,’ असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

‘फडणवीसांचेच शहर जळत असेल तर…’

नागपूरमध्ये जे घडले ते लज्जास्पद आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच शहर जळत असेल तर यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. आपले लक्ष महाराष्ट्राला पुढे नेण्यावर असले पाहिजे. क्षुल्लक मुद्यांवर वाद घालण्यावर नाही, असे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!