मुंबई: लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीशी चर्चेची दारे बंद केलेली नाहीत, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले असले तरी आज पुन्हा या निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या दुसऱ्या यादीत हिंगोली, जालना, लातूर, सातारा, सोलापूर, माढा आदी मतदारसंघांचा समावेश आहे.
या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीशी युती करून निवडणुकीला सामोरे जाईल, असे वाटत असतानाच ‘वंचित’ची मविआशी बोलणी फिस्कटली आणि पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याच्या एक दिवसआधी पहिली उमेदवार यादी जाहीर केली होती.
वंचितने पहिली यादी जाहीर केल्यानंतरही वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाची शक्यता धुसर झाल्याचे मानले जात होते. परंतु खुद्द वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीच महाविकास आघाडीशी चर्चेची दारे बंद केलेली नाहीत, असे सांगितले होते. त्याला दोन दिवसही उलटले नाही तोच आज वंचितची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
दुसऱ्या यादीतील उमेदवार असे
१. हिंगोली: डॉ. बी.डी. चव्हाण (बंजारा)
२. लातूर: नरसिंगराव उदगीरकर (मातंग)
३. सोलापूर: राहुल गायकवाड (बौद्ध)
४. माढा: रमेश बारसकर (माळी-लिंगायत)
५. सातारा: मारूती जानकर (धनगर)
६. धुळे: अब्दूर रहेमान (मुस्लिम)
७. हातकणंगले: दादासाहेब पाटील (जैन)
८. रावेर: संजय ब्राह्मणे (बौद्ध)
९. जालना: प्रभाकर बकले(धनगर)
१०. मुंबई उत्तर-मध्य: अब्दुल खान (मुस्लिम)
११. रत्नागिरी-सिंधुदुर्ग: काका जोशी (कुणबी)