यूपीएससीसाठी अर्ज करतानाच आता वय, आरक्षण दाव्याची कागदपत्रे सादर करणे अनिवार्य, पूजा खेडकर प्रकरणानंतर अर्जात केले मोठे बदल


नवी दिल्लीः  केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षांसाठी आता ऑनलाइन अर्ज करतानाच वय आणि आरक्षणाबाबतच्या दाव्याची पुष्टी करणारी कागदपत्रे सादर करणे  अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणी आणि ऑनलाइन अर्जासोबत ही कागदपत्रे सादर न करणाऱ्या अर्जदारांची उमेदवारी रद्द केली जाणार आहे. यापूर्वी प्राथमिक चाचणी (UPSC Prelim) उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवाराला ही कागदपत्रे अपलोड करावी लागत होती.

माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी फसवणूक करून चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा लाभ घेतल्याचा आरोप झाल्यानंतर देशभर मोठा वाद निर्माण झाला होता. या आरोपांची तपासणी केली असता त्यात तथ्य आढळून आले होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने आता प्रतिबंधात्मक पावले उचलत नागरी सेवा परीक्षांच्या अर्जात मोठे बदल केले आहेत.

नागरी सेवा परीक्षांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे. या ऑनलाइन अर्जासोबतच जन्मतारीख, आरक्षणाचा प्रवर्ग, कोट्याचा दावा इत्यादी बाबींची पुष्टी करणारी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. या ऑनलाइन अर्जासोबत कागदपत्रे सादर न करू शकणाऱ्या अर्जदारांची उमेदवारी रद्द करण्यात येईल, असे यूपीएससीने म्हटले आहे.

नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना यूपीएससीच्या -https://upsconline.gov.in/upsc/OTRP/index.php या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करता येईल. तीन टप्प्यात घेतली जाणारी ही परीक्षा सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. प्रिलिम, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यातही ही परीक्षा घेतली जाते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!