छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक आणि इतर वृत्तपत्रांच्या माध्यमातून वंचित समाजाला बोलके केले. यांचे प्रश्न जगासमोर प्रभावीपणे मांडून व्यवस्थेला हादरे दिले. स्वातंत्र, समता, बंधुता या मानवी मूल्यांवर आधारीत पत्रकारितेचे मानदंड घालून दिले. परंतु सध्याच्या माध्यमांनी आपली भूमिका बदलून ती गोदी मीडिया बनल्यामुळे समाजामध्ये अस्वस्थता पसरली आहे. या स्थितीतही पत्रकारांनी बाबासाहेबांना आपेक्षित असलेली समाजहिताची पत्रकारिता करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे माजी विभागीय संचालक डॉ. यशवंत भंडारे यांनी केले.
मॉडर्न कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि विक्रमशिला कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मूकनायक दिना’ निमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा न्यूजटाऊनचे संपादक सुरेश पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय पाईकराव, डॉ. सुरेश मांदळे, डॉ. पटेकर, पत्रकार अंकुश थोरात, शेख अन्वर, विजय बहादुरे यांची उपस्थिती होती.
डॉ. भंडारे यांनी यावेळी भारतातील पत्रकारितेच्या इतिहासावर प्रकाश टाकत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचे वेगळेपण आधोरेखित केले. तत्कालीन कालखंडामध्ये अनेक वृत्तपत्र होती. परंतु त्यातून अस्पृश्य समाजाचे, वंचित घटकांचे प्रश्न मांडलेच जात नव्हते. हे ओळखूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीला पाठबळ देण्यासाठी ३१ जानेवारी १९२० मध्ये मूकनायक वृत्तपत्र काढले. मूकनायकासह इतर वेगवेगळ्या पाच वृत्तपत्रातून वंचित घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात जगजागृती करत संघर्ष करण्यासाठी, हक्कांसाठी लढण्यासाठी तयार केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत, जनता, समता, प्रबुध्द भारत अशी वैशिष्टपूर्ण नावे वृत्तपत्रांना दिली. त्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ध्येय स्पष्ट होते. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून एकीकडे वंचित घटकांमध्ये जनजागृती करीत असताना दुसऱ्या बाजुला व्यवस्थेलाही अनेक प्रश्न विचारले. प्रतिकूल परिस्थितीतही बाबासाहेबांनी पाच वृत्तपत्र चालवूनही त्यांना पत्रकार म्हणून पाहिले जात नसल्याबद्दल डॉ. भंडारे यांनी खंत व्यक्त केली.
माध्यमे लोकमत घडवण्याचे काम करतात. मात्र, आताच्या माध्यमांनी समाजाला जागृत करण्याची भूमिका सोडून दिल्याने समाजामध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळेच जबाबदार पत्रकारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपेक्षित असलेली समाजहिताची पत्रकारिता करावी, असे आवाहन त्यांनी केले.
पत्रकारितेच्या नावाखाली प्रपोगंडा हा लोकशाहीचा घातः पाटील
सध्या पत्रकारितेच्या नावाखाली प्रपोगंडा सुरू असून माध्यमे, सरकार, भाजप आणि मोदी हे एकमेकात विलीन झाले आहेत. त्यामुळे पत्रकारिता आणि प्रपोगंडा यातील फरक कळणेच अवघड होऊन बसले आहे. ही पत्रकारितेची अवनती असून हा लोकशाहीचा घात आहे, असे न्यूजटाऊनचे संपादक सुरेश पाटील यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितले.
लोकांना खऱ्या माहितीची गरज आहे. ज्यांच्यासाठी हा प्रपोगंडा चालवला जात आहे, त्यांनाही खऱ्या माहितीची गरज आहे. कारण नागरिक हे हवेतून निर्माण होत नसतात. पण तेही या अवनतीचे समर्थन करत आहेत. अशा प्रपोगंडाचे समर्थन म्हणजे लोकशाहीचा घात आहे. हा प्रपोगंडा तुम्हाला उल्लू बनवतो. तुम्ही उल्लू बनणे हे लोकशाहीचा अस्त होण्यासारखेच आहे, असेही पाटील म्हणाले.
जाणतेपणी समर्थन करणे आणि नशेचे इंजेक्शन घेऊन समर्थन करणे यात फरक आहे. सत्य आणि तथ्य समजण्याच्या शक्यताच हल्ली मावळल्या आहेत. अशा स्थितीत देशातील पत्रकारांनी बाबासाहेबांच्या लोकपत्रकारितेच्याप्रती मूकनायकच्या स्थापनादिनी जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त करायला हवी. त्यातून समाजाच्या अवनतीचे चट्टे थोपवण्याच्या धडपडीला निश्चितच बळ मिळेल, असा आशावादही पाटील यांनी व्यक्त केला.
मूकनायकने बहिष्कृतांना, अस्पृश्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. त्यांचे एक नवे विचार युग निर्माण केले. त्यामुळे मूकनायक हे केवळ वृत्तपत्र नव्हते तर ते देशातील बहिष्कृतांचे, अस्पृश्यांचे अस्तित्वपत्र होते. बाबासाहेबांचे बहुतांश लेखन हे इंग्रजी भाषेतून आहे. परंतु त्यांनी आपल्या पत्रकारितेची सुरूवात हेतुतः मराठी भाषेतून केली. त्यामुळे बाबासाहेबांनी मूकनायकपासून प्रबुद्ध भारतपर्यंतच्या वृत्तपत्रांतून केलेली पत्रकारिता इंग्रजीसह अन्य भाषांत अनुवादित होणे गरजेचे आहे, असेही पाटील म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. सचिन बनसोडे यांनी मूकनायक दिनाचे महत्व, मूकनायक दिन साजरा करण्यामागची भूमिका सांगितली. सूत्रसंचालन मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. अस्मिता साळवे यांनी केले तर योगिराज वाघमारे यांनी आभार मानले. पाहुण्यांचा परिचय अंकुश खेत्रे, चेतन सोनकांबळे यांनी करुन दिला. कार्यक्रमाच्या यश्वस्वीतेसाठी मॉडर्न कॉलेज आणि विक्रमशिला कॉलेजचे संतोष प्रधान, ज्योती मोरे, प्रज्ञा सोनवणे यांच्यासह कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.