MPSC परीक्षांच्या सुधारित तारखांबाबत अनिश्चितताच, लोकसेवा आयोग म्हणतोः एसईबीसी आरक्षण कोट्यामुळे कितीवेळ…


 मुंबई: सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच परिक्षांच्या  सुधारित तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कळवले आहे. मात्र मराठा समाजाला देण्यात आलेले एसईबीसी आरक्षण विचारात घेऊन सुधारित मागणीपत्रे कधी मिळतील, याबाबत निश्चितता नसल्याने या परीक्षा नेमक्या कधी घेतल्या जातील? हे सांगता येणार नसल्याचे एमपीएससीने म्हटले आहे.

राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता २६ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या आरक्षण अधिनियम २०२४ मधील तरतुदीनुसार, २६ फेब्रुवारी २०२४ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत किंवा जाहिरात प्रसिद्ध होऊन अर्ज मागवण्यात आलेले असून निवड प्रक्रिया सुरु झालेली नाही, अशा प्रकरणी शासनाकडून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून घेणे गरजेचे आहे व त्याप्रमाणे मागणीपत्र पाठवण्याबाबत शासनाच्या सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना कळवण्यात आले आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) म्हटले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा-२०२४ साठी २९ डिसेंबर २०२३ रोजी विविध संवर्गातील एकूण २७४ पदांकरीता जाहिरात क्रमांक ४१४/२०२३ प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा  २८ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात येणार होती.

 परंतु, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी २६ फेब्रुवारी, २०२४ रोजी आरक्षण अधिनियम, २०२४ अंमलात आल्याने या अधिनियमातील तरतुदी विचारात घेता आयोगाच्या २१ मार्च २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ तसेच १९ मे २०२४ रोजी नियोजित समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ करिता शासनाच्या महसूल व वन विभाग, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग, ग्राम विकास विभाग, आदिवासी विकास विभाग, उद्योग उर्जा व कामगार विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग इत्यादी विभागांकडून विविध गट-अ व गट-ब राजपत्रित संवर्गाकरिता प्राप्त मागणीपत्रामध्ये अराखीव पदांचा समावेश असल्याने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण विचारात घेऊन सुधारित मागणीपत्र पाठवण्याबाबत शासनाच्या संबंधित विभागास कळवण्यात आले आहे, असे एमपीएससीने म्हटले आहे.

सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त होण्यास किती कालावधी लागेल याबाबत निश्चितता नसल्याने सध्या परिक्षेची सुधारित तारीख जाहीर करता येत नाही. प्रस्तुत परीक्षेतील सर्व संवर्गाकरिता प्रशासकीय विभागाकडून सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर परिक्षेच्या पूर्व तयारीसाठी पुरेसा कालावधी देऊन तसेच संघ लोकसेवा आयोग व कर्मचारी चयन आयोग इत्यादींमार्फत आयोजित स्पर्धा परीक्षेच्या तारखा विचारात घेऊन परिक्षेच्या सुधारित तारखा आयोगामार्फत जाहीर करण्यात येतील, असे एमपीएससीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *