नवी दिल्लीः विद्यापीठे आणि महाविद्यालयात सहायक प्राध्यापकपदी नियुक्तीसाठी नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण होणे अद्यापही अनिवार्यच असल्याचा स्पष्टीकरण विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूसीजी) अध्यक्ष एम. जगदीशकुमार यांनी दिले आहे. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाची पदव्युत्तर पदवी संपादन केलेल्यांना सहायक प्राध्यापकपदी नियुक्तीसाठी यूजीसी- राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC-NET) किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे, असे जगदीशकुमार म्हणाले.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मागच्या सोमवारी विद्यापीठे आणि महाविद्यालयातील अध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या आणि पदोन्नतीसाठी किमान पात्रता नियमांचा यूजीसीचा मसुदा अधिसूचित केला. त्यानंतर विद्यापीठे आणि महाविद्यालयात आता सहायक प्राध्यापकपदी नियुक्तीसाठी नेट/सेट अनिवार्य नाही, केवळ पदव्युत्तर पदवी असली तरीही सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती मिळवता येईल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता.
या गोंधळावर आता यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदीशकुमार यांनी एक्सवर एक व्हिडीओ जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. ‘आता उच्च शिक्षण संस्थांमध्ये अध्यापकीय पदांसाठी आवेदन करण्यासाठी यूजीसीची नेट परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य नाही, केवळ पदव्युत्तर पदवीवरच विद्यापीठे आणि महाविद्यालयात अध्यापक बनू शकता, असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. परंतु ते सर्व चुकीचे आहे. जर तुमच्याकडे कोणत्याही बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाची पदव्युत्तर पदवी असेल तर अध्यापकीय पदासाठी आवेदन करण्यासाठी तुम्हाला यूजीसी-नेट उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे अभियांत्रिकी अथवा तंत्रज्ञानातील एमटेक/एमई सारखी एखाद्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची पदव्युत्तर पदवी असेल तर मात्र तुम्हाला अध्यापकीय पदासाठी यूजीसी नेट उत्तीर्ण करण्याची आवश्यकता नाही. हा बदल अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेच्या (एआयसीटी) च्या मार्गदर्शक तत्वानुसारच आहे,’ असे जगदीशकुमार यांनी म्हटले आहे.
विद्यापीठे आणि महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकपदावर नियुक्तीसाठी यूजीसीने चार नियम जारी केले आहेत. त्याबाबतचा खुलासाही जगदीशकुमार यांनी केला आहे.
‘यांना’ नेट अनिवार्यच
- विद्यापीठे आणि महाविद्यालयात सहायक प्राध्यापकपदाच्या भरतीसाठी यूजीसीने जारी केलेल्या २०२५ च्या मसुद्यानुसार जर तुमच्याकडे कला, वाणिज्य, मानव्यविद्या, शिक्षण, विधी, सामाजिक शास्त्रे, विज्ञान, भाषा, ग्रंथालय शास्त्र, शारीरिक शिक्षण, पत्रकारिता व जनसंवाद, व्यवस्थापन शास्त्र, नाट्य, योग, संगीत, उपयोजित कला, व्हिज्युअल आर्ट्स, मूर्तीकला यासारख्या पारंपरिक भारतीय कलारुपसारख्या विषयांतील ५५ टक्के किमान गुणांसह (अथवा समकक्ष श्रेणी) पदव्युत्तर पदवी (एनसीआरएफ लेव्हल ६.५) असेल तर तुम्हाला सहायक प्राध्यापकपदी नियुक्तीसाठी पात्र होण्यासाठी यूजीसी नेट/सेट उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल.
‘यांच्या’साठी नेटची आवश्यकता नाही
- इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी विषयातील सहायक प्राध्यापकपदी नियुक्तीसाठी पात्र होण्यासाठी जर तुमच्याकडे किमान ५५ टक्के गुणांसह (अथवा समकक्ष श्रेणी) पदव्युत्तर पदवी (एनसीआरएफ लेव्हल ७, उदा. एमई, एमटेक) असेल तर तुम्ही बिना नेट/सेट सहायक प्राध्यापकपदी नियुक्तीसाठी पात्र ठरता. ही पात्रता इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी विषयातील एन्ट्री लेव्हलच्या नियुक्त्यांसाठी एआयसीटीईच्या आवश्यकतेला अनुरूपच आहे.
पीएचडी असल्यास काय?
तुमच्याकडे जर उपरोल्लेखित सर्व विषयांपैकी कोणत्याही एका विषयातील पीएच.डी. पदवी असेल तर तुम्ही यूजीसी नेट/सेट उत्तीर्ण न करताही सहायक प्राध्यापकपदी नियुक्तीसाठी पात्र ठरता, असेही यूजीसीने म्हटले आहे.
पदवी आणि व्यावसायिक उपलब्धीवर नियुक्ती
नाटक, योग, संगीत, उपयोजित कला, व्हिज्युअल आर्ट्स आणि मूर्तीकलासारख्या अन्य पारंपरिक भारतीय कला विषयात जर तुमच्याकडे अंडर ग्रॅज्युएट डीग्री आणि उल्लेखनीय व्यावसायिक उपलब्धी असलेले आवेदक सहायक प्राध्यापकपदी नियुक्तीसाठी पात्र आहेत.
ज्या विषयात नेट किंवा पीएचडी त्याविषयात नियुक्ती
आता तुम्ही ज्या विषयात पीएच.डी, नेट आणि जेआरएफसाठी पात्रता संपादन कराल, त्या विषयात तुम्हाला सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती मिळवता येईल. तुम्ही ज्या विषयात पदवी अथवा पदव्युत्तर पदवी संपादन केलेली असेल, त्याच विषयात तुम्ही पीएच.डी. अथवा नेट/सेट करणे अनिवार्य असणार नाही. ज्या विषयात पीएच.डी. अथवा नेट/सेट कराल त्याच विषयात तुम्ही विद्यापीठे आणि महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक होऊ शकता, असेही यूजीसीने म्हटले आहे.