पुणेः शिक्षक भरतीसाठीची पात्रता परीक्षा ‘टीईटी’चा निकाल जाहीर झाला असून परीक्षेला बसलेल्या एकूण ३ लाख १ हजार ९६२ उमेदवारांपैकी केवळ ६४ हजार ८३० उमेदवारच या परीक्षेत पात्र ठरले आहेत.
शिक्षक भरतीसाठी अनिवार्य असलेली टीईटी परीक्षा यावर्षी सप्टेंबर महिन्यात घेण्यात आली होती. टीईटीच्या पहिल्या पेपरला १ लाख ४३ हजार ७२० उमेदवार बसले होते त्यापैकी फक्त १४ हजार ९२२ उमेदवार पात्र ठरले आहेत. तर दुसऱ्या पेपरला १ लाख २७ हजार १३१ उमेदवार बसले होते. त्यापैकी ४९ हजार ९०८ उमेदवार पात्र ठरले आहेत.
राज्यात सध्या १३ हजार ५०० शिक्षकांच्या जागांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना शाळांचे वाटप केल्यानंतर नवीन शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यास सुरूवात झाली आहे.
शिक्षक भरतीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात पुन्हा २० हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. या शिक्षक भरतीची अधिसूचना लवकरच जारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना या शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.