थिएटरबाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी ‘पुष्पा २’चा अभिनेता अल्लू अर्जुनला अटक, मनोरंजन जगतात खळबळ


हैदराबादः ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमिअर शोदरम्यान हैदराबादेतील संध्या चित्रपटगृहाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुनला ताब्यात घेतले आहे. पुष्पा २ चित्रपटाच्या प्रीमिअर शोदरम्यान अभिनेता अल्लू अर्जुन संध्या थिएटरबाहेर हजर होता. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी आलेल्या त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली होती. या प्रकरणी अल्लू अर्जुनला पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.

 हैदराबादेतील एरटीसी एक्स रोडवरील संध्या थिएटरमध्ये पुष्पा चित्रपटाचा प्रीमिअर शो ठेवण्यात आला होता. या प्रीमिअर शोच्या वेळी अभिनेता अल्लू अर्जुन संध्या थिएटरबाहेर उपस्थित होता. यावेळी अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन दोन चाहत्यांचा मृत्यू झाला होता.

या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या एका महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून चिकडपल्ली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ आणि ११८ (१) अन्वये अभिनेता अल्लू अर्जुन, त्याचे सुरक्षा पथक आणि चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी आता चिकडपल्ली पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक केली आहे. चिकडपल्ली पोलिस अधिक तपास करत आहेत. ‘पुष्पा’ चित्रपटाच्या प्रीमिअर शोच्या वेळी चित्रपटगृह व्यवस्थापनाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.

अल्लू अर्जुनच्या आगोदर चिकडपल्ली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. थिएटर व्यवस्थापान किंवा कलाकाराच्या टीमने गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही अतिरिक्त व्यवस्था केली नव्हती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. अल्लू अर्जुनने ६ डिसेंबर रोजी मृताच्या कुटुंबीयासाठी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती आणि घडलेल्या घटनेबाबत खंतही व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *