
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याविरुद्ध उचित कार्यवाही करा, असे निर्देश राज्यपाल सचिवालयाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले आहेत. त्यामुळे कुलगुरू डॉ. फुलारी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची फसवणूक करून सिद्दीकी मोहम्मद शोएब हबीबुद्दीन याने बी.एस्सी व एम.एस्सी पदवीच्या बनावट गुणपत्रिका आणि पदव्यांच्या आधारे नोव्हेंबर २०२१ मध्ये पीएच.डी.ला प्रवेश मिळवला होता. मोहम्मद शोएबने वाराणसीच्या महात्मा गांधी काशी विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून या दोन्ही पदव्यांच्या बनावट व खोट्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रे तयार केल्याचे या विद्यापीठाने कळवल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मोहम्मद शोएबची फक्त पीएच.डी.ची नोंदणी रद्द केली. मात्र अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.
रिपाइंचे (आठवले) शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी याबाबत १५ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार करूनही कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी २० मे रोजी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. त्या तक्रारीवर पोलिस आयुक्तांनी कुलसचिवांना पत्र देऊन आपल्यास्तरावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
बनावट गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रांच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश मिळवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने गुन्हे दाखल केले. परंतु मोहम्मद शोएबच्या प्रकरणात कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे. कार्यवाही होऊ नये म्हणून मोहम्मद शोएब आणि त्याच्या परिवाराने कुलगुरू डॉ. फुलारी व विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या वारंवार भेटी घेतल्या. त्या आजही सुरू आहेत. कुलगुरू व विद्यापीठ प्रशासन मोहम्मद शोएब या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न का करत आहेत?, असा आरोप करत गायकवाड यांनी विद्यापीठांचे कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे लेखी तक्रार करून कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केली होती.
राज्यपाल सचिवालयातील अवर सचिव विकास कुलकर्णी यांनी गायकवाड यांच्या तक्रारीची दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिले असून कुलगुरू डॉ. फुलारी यांच्याबाबत गायकवाड यांनी केलेली तक्रार आपल्या विभागाच्या अखत्यारित येत असल्यामुळे सदर पत्र आपल्यास्तरावर नियमानुसार पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठवण्यात येत आहे, असे नमूद करत उचित कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. आता राज्यपाल सचिवालयाकडून पाठवलेल्या या पत्राआधारे उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी कार्यवाही सुरू केल्यास कुलगुरू डॉ. फुलारी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
