आझाद मैदानावर उद्या फक्त तीन जणांचाच शपथविधी, मग उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी? वाचा इनसाईड स्टोरी


मुंबईः  महायुतीचा सत्तास्थापनेचा मुहूर्त अवघ्या काही तासांवर आला आहे. आज केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडल्यानंतर महायुतीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यातच या शपथविधी समारंभाबाबत महत्वाची माहिती पुढे येत आहे. आझाद मैदानावर उद्या (५ डिसेंबर) होणाऱ्या शाही शपथविधी समारंभात फक्त तिघांचाच शपथविधी होणार आहे. त्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश असेल. उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला. परंतु गेल्या दहा दिवसांपासून महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून बरीच खलबते सुरू होती. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसल्याच्या प्रारंभी बातम्या येत होत्या. परंतु नंतर त्यांनीच आपण काहीही अडवून धरलेले नाही, असा खुलासा केला होता.

महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांची तर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी आधीच निवड केली आहे. आज भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे. त्यासाठी भाजपने दोन केंद्रीय निरीक्षक पाठवले आहेत. त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश आहे.

भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडल्यानंतर महायुतीचे नेते दुपारी ३.३० वाजता राजभवनात जाऊन राज्यपाल के.सी. राधाकृष्ण यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. त्यानंतर राज्यपालांकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळाल्यानंतर ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर शाही शपथविधी समारंभ होणार आहे. मात्र या शपथविधी समारंभात फक्त तिघांचाच शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या शपथविधी समारंभासाठी फारच कमी वेळ दिल्यामुळे उद्या केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत देवेंद्र फडणवीस हे सर्वात पुढे आहेत. त्यामुळे तेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदासाठी राजी झाल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांच्या नावे नोंदला जाणार आहे.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षातील आमदार मंत्रिपदासाठी इच्छूक असून आझाद मैदानावर आपलाही शपथविधी व्हावा, अशी त्यापैकी अनेकांची इच्छा आहे. परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या शपथविधी समारंभासाठी फार कमी वेळ दिला आहे. प्रधानमंत्री कार्यालयाने मोदींच्या मुंबई दौऱ्याची वेळ वाढवून दिली तरच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुखमंत्र्यांसह इतर काही मंत्र्यांचाही शपथविधी होण्याची शक्यता आहे. अन्यथा उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी होईल, अशी माहिती समोर येत आहे.

या शपथविधी समारंभासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या शपथविधी समारंभात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीही ठेवण्यात आली आहे.

लाडक्या बहिणींसाठी खास कक्ष

या शपथविधी समारंभात २५ हजार लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेल्या ‘लाडक्या बहिणीं’साठी आझाद मैदानावर लाडकी बहीण हा विशेष कक्ष उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी १० हजार महिलांची बैठक व्यवस्था केली जाणार आहे.

शपथविधीतही ‘एक है तो सेफ है

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने ‘एक है तो सेफ है’ नारा दिला होता. उद्या होणाऱ्या शपथविधी समारंभातही एक है तो सेफ है हा नारा दिसणार असून त्यासाठी खास कक्ष असणार आहे. एक है तो सेफ है असा मजकूर असलेले टी-शर्ट परिधान करून महायुतीचे कार्यकर्ते बसणार आहेत. या शपथविधीवेळी सुमारे ५ हजार पोलिस आझाद मैदानावर तैनात असणार आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!