रायपूरः बलवानांपुढे मान झुकवायची, ही सावरकरांची विचारधारा आहे. म्हणजेच कमकुवत असणाऱ्याशीच तुम्ही लढणार का? याला भ्याडपणा म्हणतात. हाच का तुमचा राष्ट्रवाद? असा सवाल करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही सत्याग्रही आहोत आणि भाजप-आरएसएस सत्ताग्रही आहेत, असे टिकास्त्रही त्यांनी सोडले.
छत्तीसगडमधील रायपूर येथे काँग्रेसचे ८५ वे महाअधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी राहुल गांधी यांनी भाजप, आरएसएसवर सडकून टीका केली.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत एक मंत्री म्हणाले की, चीनची अर्थव्यवस्था भरतापेक्षा मोठी आहे. मग आपण त्यांच्याशी कसे लढू शकतो? जेव्हा ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते, तेव्हा त्यांची अर्थव्यवस्था आपल्या अर्थव्यवस्थेपेक्षा लहान होती का? याचा अर्थ तुमच्यापेक्षा जे बलवान आहेत, त्यांच्याशी तुम्ही लढू शकणार नाही का? जे कमकुवत आहेत त्यांच्याशीच लढणार का?, असे राहुल गांधी म्हणाले.
याचा अर्थ जे तुमच्यापेक्षा बलवान आहेत त्यांच्यापुढे तुम्ही मान झुकवणार. याला भ्याडपणा म्हणतात. जे तुमच्यापेक्षा बलवान आहेत, त्यांच्यापुढे गुडघे टेका, ही सावरकरांची विचारधारा आहे. हाच का तुमचा राष्ट्रवाद? हीच देशभक्ती आहे का? ही कोणती देशभक्ती आहे?, असे सवाल राहुल गांधी यांनी केले.
आम्ही सत्याग्रही आहोत आणि भाजप-आरएसएस सत्ताग्रही आहेत. सत्तेसाठी ते काहीही करू शकतात. कुणाशीही हातमिळवणी करतील. कोणाच्याही पुढे झुकतील. ही यांची वस्तुस्थिती आहे, असे टिकास्त्रही राहुल गांधी यांनी सोडले.
अदानी आणि मोदी एक आहेत. देशाचा सर्वच्या सर्व पैसा एका व्यक्तीच्या हातात चालला आहे. जेव्हा आम्ही संसदेत प्रश्न विचारतो तर माझे आणि खारगे यांचे भाषण संसदेच्या पटलावरून काढून टाकले जाते. आम्ही हजार वेळा प्रश्न विचारणार. जोपर्यंत सत्य समोर येत नाही, तोपर्यंत प्रश्न विचारत राहू, असे राहुल गांधी म्हणाले.
ऑस्ट्रेलियातील एका फोटोत मोदी, एसबीआयचे अद्यक्ष आणि अदानी एकत्र बसलेले आहेत. एसबीआय अदानींना १ दशलक्ष डॉलरचे कर्ज देत आहे. तिथे मोदी का बसलेले आहेत? त्यांचा काय संबंध आहे? आमचा काहीही संबंध नाही, असे ते सरळ सांगतात. परंतु संबंध आहे. अदानी आणि मोदी एक आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.
आम्ही अदानींबाबत प्रश्न विचारत राहू. काँग्रेस मागे हटणार नाही. अदानी आणि प्रधानमंत्र्यांचा काय संबंध आहे? असे मी संसदेत विचारले तर संपूर्ण सरकार आणि सर्व मंत्री अदानींची पाठराखण करू लागले. जो अदानींवर हल्लाबोल करेल, तो देशद्रोही आहे, असे ते म्हणतात. म्हणजे अदानी सर्वात मोठे देशभक्त बनले आहेत. भाजप- आरएसएस अदानींना पाठीशी का घालत आहेत? खरा प्रश्न आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
माझ्याकडे स्वतःचे घर नाहीः १९७७ सालाची गोष्ट. तेव्हा मी सहा वर्षांचा होता. एक दिवस घरात वेगळाच माहौल होता. मी आईला विचारले काय झाले? तेव्हा मला सांगण्यात आले की, आपण हे घर सोडून चाललो आहोत. कारण हे घर आपले नाही, सरकारचे आहे. मी आईला विचारले कुठे जायचे आहे? तर ती म्हणाली, माहीत नाही. ५२ वर्षे झाली माझ्याकडे अजूनही स्वतःचे घर नाही, असे राहुल गांधी म्हणाले.