नागपूरः उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पुनर्मूल्यांकन शुल्क परत करण्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने घेतला आहे. नवीन वर्षात १० जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. विद्यापीठाच्या अधिसभेत हा निर्णय घेण्यात आला.
हिवाळी परीक्षा २०२३ पासून जे विद्यार्थी पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झाले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. विद्यापीठाच्या अधिसभेने घेतलेल्या या निर्णयाला परीक्षा व मूल्यांकन मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. या निर्णयाच्या लाभासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांच्या बँक खात्यांची माहिती महाविद्यालयांकडून मागवण्यात येणार आहे.
उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून प्रतिविद्यार्थी, प्रतिउत्तरपत्रिका ४५० रुपये शुल्क आकारण्यात येते. मात्र पुनर्मूल्यांकनात विद्यार्थ्यांचे गुण वाढले किंवा विद्यार्थी उत्तीर्ण झाले तरीही त्यांचे पुनर्मूल्यांकन शुल्क परत केले जात नाही. पुनर्मूल्यांकनात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास त्याचे शुल्क परत करण्यात यावे, अशी मागणी माजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे यांच्या कार्यकाळापासूनच करण्यात येत होती.
मंगळवारी झालेल्या विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत ऍड. मनमोहन बाजपेयी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विद्यापीठ प्रशासन यासंदर्भात निर्णय घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या मुद्द्यावर व्यापक चर्चा झाल्यानंतर पुनर्मूल्यांकन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन शुल्क परत करण्यात येईल. या निर्णयाची अंमलबजावणी १० जानेवारी २०२५ पासून करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. संजय कविश्वर यांनी सभागृहाला सांगितले.
ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, अशा सूचना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी परीक्षा व मूल्यांकन मंडळाला दिल्या आहेत. या निर्णयाअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांच्या बँक खात्यांची माहिती संलग्नित महाविद्यालयांकडून मागवण्यात येईल आणि पुनर्मूल्यांकन शुल्क थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, असे डॉ. कविश्वर यांनी सांगितले.
अन्य विद्यापीठांचे काय?
महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून प्रतिउत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन शुल्क आकारले जाते. परंतु पुनर्मूल्यांकनात विद्यार्थी उत्तीर्ण झाला तरीही त्याचे शुल्क परत केले जात नाही. पुनर्मूल्यांकन शुल्कातून विद्यापीठांची मोठी कमाई होते. विद्यार्थ्याला आधी परीक्षा शुल्क आणि नंतर पुनर्मूल्यांकन शुल्क असा दुहेरी भूर्दंड बसूनही विद्यापीठे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचेही शुल्क खिशात घालतात. आता नागपूर विद्यापीठाने हे शुल्क परत करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील अन्य विद्यापीठातही या निर्णयाच्या अंमलबजावणीची मागणी जोर धरण्याची शक्यता आहे.