नागपूरः महाराष्ट्र- तेलंगणा सीमावर्ती भागात आज सकाळी ७.३० ते ७.३५ दरम्यान भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावण पसरले आहे. नागपूरसह पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही ठिकाणी भूकंपाचे हे धक्के जाणवले.
तेलंगणाच्या मुलुगू जिल्ह्यात या भूकंपाची तीव्रता रिश्टरस्केलवर ५.३ एवढी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मुलुगूपासून ५५ किलोमीटर अंतरावर होता. मुलुगू हे ठिकाण नागपूरपासून ४२५ किलोमीटर अंतरावर आहे.
या भूकंपाचे धक्के पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अहेरी, आल्लापल्ली भागात जाणवले. पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचे धक्के कोरचीपासून ते सिरोंचा आणि छत्तीसगडच्या भोपालपट्टनमपर्यंत जाणवले.
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यालाला लागूनच तेलंगणा राज्याची सीमा आहे. हा भाग गोदावरी फॉल्ट भूकंप प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. या भूकंपामुळे विदर्भात कुठेही जिवित हानी झाल्याचे वृत्त नाही.