मुंबई: महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रात अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये या मागणीसह वीज क्षेत्राच्या खासगीकरणाच्या विरोधात महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या शासकीय वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून ७२ तासांचा संप पुकारला आहे. त्यामुळे तीन दिवस राज्यात वीजपुरवठा खंडित होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने तयारी ठेवली आहे. राज्यातील जनतेने भयभीत होण्याची गरज नसल्याचे महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर सुरळीत वीजपुरवठ्यासाठी विविध उपाययोजनांसह विभाग, मंडल व परिमंडल स्तरावर २४ तास सुरू राहणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीमधील ३० विविध संघटनांनी हा संप पुकारला आहे. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडून पर्यायी स्वरूपात मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत आहे. संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्यस्रोत कर्मचारी, महावितरणचे ॲप्रेंटिस, विद्युत सहायक, प्रशिक्षणार्थी अभियंता, देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या निवड सूचीवरील कंत्राटदारांचे कर्मचारी यांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.
शासनाच्या विविध विभागातील सेवानिवृत्त विद्युत अभियंता व तांत्रिक कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक कार्यालयामधील विद्युत अभियंता व कर्मचारी यांच्याशी संपर्क करण्यात आला असून त्यांचे सहकार्य मिळणार आहे. बाह्यस्रोत कंत्राटदारांना अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे.
संपकाळामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी प्रत्येक विभागात निवडसूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ व वाहनांसह संबधीत कार्यालयांमध्ये उपलब्ध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच महावितरणकडून वितरण रोहीत्र, ऑईल, वीजतारा, केबल्स, वीजखांब, फिडर पिलर्स, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सेस, वाहतुकीसाठी वाहने आदी आवश्यक साधनसामुग्री महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये उपलब्ध ठेवण्यात आली आहे.
येथे करा वीज पुरवठा खंडित झाल्यास तक्रारः प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसह पाणी पुरवठा योजना, रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला त्या ठिकाणी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून (बॅकफिड) वीजपुरवठा सुरू करण्यात येईल.
या संपाची व्याप्ती मोठी असल्याने पर्यायी सेवा देणाऱ्या अभियंता व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे तसेच वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
भयभीत होण्याची गरज नाहीः राज्यातील जनतेने कुठेही भयभीत होण्याची गरज आवश्यकता नाही. वीज कर्मचारी त्यांच्या संपाविषयीची भूमिका बदलतील याची खात्री आहे. अन्यथा पर्यायी व्यवस्था झाली असल्याने विद्युत पुरवठा अखंडित राहील याची खात्री बाळगावी, असे ट्विट महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी केले आहे.
मेस्मा लागू करण्याचे संकेतः कामगार संघटनांनी बेकायदा संप सुरू न ठेवता तो त्वरित मागे घ्यावा. संपकऱ्यांवर मेस्मा लागू कायदा लागू करण्याची वेळ आणू नये, असा इशारा महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी दिला आहे.