
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): जळगाव येथील आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय आंबेडकरी अस्मिता पुरस्कार यंदा महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आंबेडकरी कवी-गायक प्रा. डॉ. किशोर वाघ यांना झाला आहे. प्रा. डॉ. वाघ हे पाथ्रीच्या राजर्षि शाहू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. विद्यार्थीदशेपासूनच ‘आंबेडकरी जलसा’च्या माध्यमातून ते समाज प्रबोधन करत आले आहेत.
प्रा. डॉ. किशोर वाघ यांनी गेल्या २५ वर्षापासून फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीत मानवतावादी महापुरुषांच्या विचारधारेवर आधारित ‘आंबेडकरी जलसा’च्या माध्यमातून सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात निष्ठेने प्रबोधनाचे अविरत काम केले आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील कवी, गायक, गीतकार व प्राध्यापक म्हणून उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
जळगावच्या आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानच्या वतीने सन २००३ पासून दीनदलित समाजाकरिता कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे नितीधैर्य वाढवण्यासाठी राज्यस्तरीय आंबेडकरी अस्मिता पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. आप्पासाहेब भालेराव यांच्या स्मृतिदिनी येत्या ८ मार्च रोजी जळगाव येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
२००३ पासून आजपर्यंत या प्रतिष्ठानने महाराष्ट्रातील अनेक नामवंतांना राज्यस्तरीय आंबेडकरी अस्मिता पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यात डॉ. गंगाधर पानतावणे, प्रतापसिंगदादा बोदडे, डॉ. आनंद तेलतुंबडे, उत्तम कांबळे, शाहीर विठ्ठल उमप, नितीन चंदनशिवे इत्यादी मान्यवरांचा समावेश आहे. यंदाचा हा पुरस्कार डॉ. किशोर वाघ यांना जाहीर झाल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद भालेराव यांनी पत्राद्वारे कळवले आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे प्रा. डॉ.किशोर वाघ यांचे महाविद्यालय, संस्था व समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
