सोलापूरः बेरोजगारी, आरक्षण आणि खासगीकरणाच्या मुद्यावर सोलापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पोलिसांसमक्ष काळा झेंडा दाखवून त्यांच्या अंगावर शाईफेक केल्यामुळे पाच महिन्यांपूर्वी चर्चेत आलेले भीम आर्मीचे सोलापूर शहराध्यक्ष अजय मैंदर्गीकर यांना अखेर सोलापूर पोलिसांनी सोलापूर आणि नजीकच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.
अजय मैंदर्गीकर हे आक्रमक आंबेडकरी कार्यकर्ते असून भीम आर्मी संघटनेच्या माध्यमातून ते विविध प्रश्नांवर आक्रमकपणे आंदोलने करतात. गेल्या वर्षी १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात आले असता अजय मैंदर्गीकर (वय २६ वर्षे) यांनी पोलिसांची सुरक्षा व्यवस्था भेदून पालकमंत्री पाटलांसमोर अचानकपणे काळा झेंडा दाखवून निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या.
राज्य सरकारने खासगी/कंत्राटी भरतीचा शासन निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी घोषणा देतच चंद्रकांत पाटलांना काळा झेंडा दाखवून अजय मैंदर्गीकर यांनी पाटलांवर शाईफेक केली होती. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धांदड उडाली होती.
यापूर्वी मैंदर्गीकर यांनी एका सामूहिक विवाह सोहळ्यात भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना गाठून त्यांच्या अंगावर शाईफेक केली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केल्यामुळे मात्र ते चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी मैंदर्गीकर यांच्या विरोधात सोलापुरातील सदर बाजार पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३५३ आणि ३३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना सलग २६ दिवस तुरुंगात ठेवण्यात आले होते.
२६ दिवसांच्या तुरुंगवासातून बाहेर आल्यानंतर त्यांचे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले होते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटिशीला आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला होता.
सोलापूरच्या जोडभावी पेठ पोलिसांनी अजय मैंदर्गीकर यांच्यावर सरकारी नोकरांवर हल्ला करणे, इतरांच्या जिवितास आणि व्यक्तिगत सुरक्षेस धोका निर्माण करणे, दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये करणे असे आरोप ठेवत त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांच्याकडे पाठवला होता.
कबाडे यांनी तो प्रस्ताव मान्य करून अजय मैंदर्गीकर यांना सोलापूर आणि नजीकच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला. त्यानुसार मैंदर्गीकर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.