छत्रपती संभाजीनगरात राजू शिंदेंसह भाजपचे ६ नगरसेवक, पदाधिकारी ठाकरे गटाच्या वाटेवर; आ. संजय शिरसाठांची कोंडी करण्याचा प्रयत्न


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  लोकसभा निवडणुकीनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंनी भाजपला धक्का देण्याची तयारी चालवली आहे. छत्रपती संभाजीनगरातील भाजपचे ६ ते ८ नगरसेवक आणि पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असून त्यात राजू शिंदे यांचाही समावेश आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे विजयी झाले. हा विजय शिंदेसेनेला उभारी देणारा असला तरी स्थानिक भाजप पदाधिकारी मात्र कमालीचे नाराज झालेले आहेत. आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फक्त शिंदेसेनेचेच काम करायचे का? असा सवाल भाजपचे नाराज नेते आणि पदाधिकारी करत आहेत.

गेल्या दोन-अडीच वर्षांपासून आम्ही लोकसभेची तयारी करत होतो. परंतु जागावाटपात संभाजीनगरची जागा शिंदेसेनेला सोडण्यात आली. त्यामुळे आम्ही लोकसभेला शिंदेसेनेच्या उमेदवाराचे काम केले. पण त्याबद्दल त्यांनी साधी कृतज्ञताही व्यक्त केली नाही. आता आम्ही जिल्ह्यात काय फक्त शिंदेसेनेचे काम करायचे का? असा सवाल भाजपचे नाराज पदाधिकारी करत आहेत.

जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी उद्धव ठाकरेंना साथ द्या, मूळ शिवसेनेत प्रवेश करा, अशी लोकांची भावना आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेत आहोत, असे भाजप नेते राजू शिंदे यांनी म्हटले आहे. येत्या ७ जुलै रोजी भाजपचे ६ ते ८ नगरसेवक, पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील. त्यात उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतींचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजप नेते राजू शिंदे यांनी २०१९ मध्ये औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढवली होती. या निवडणुकीत त्यांना ४३ हजार ३४७ मते मिळाली होती. शिवसेनेचे संजय शिरसाठ या मतदारसंघातून विजयी झाले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदेंसोबत गेले. तेव्हापासून उद्धव ठाकरे व त्यांच्या शिवसेनेवर शिरसाठ हे कायम टीका करत आले आहेत.

आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला खिंडार पाडून संजय शिरसाठ यांचीही कोंडी करण्याची रणनिती उद्धव ठाकरे यांनी आखल्याचे दिसू लागले आहे. गेली विधानसभा निवडणूक अपक्ष लढवणारे राजू शिंदे यांना पक्षात घेऊन त्यांना औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा संजय शिरसाठ विरुद्ध राजू शिंदे अशी लढत पहायला मिळू शकते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *