नागपूर: मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान ३० ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यातील बीड आणि माजलगाव या दोन्ही शहरातील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन दिवसात विशेष तपास पथकाची (स्पेशल इन्वेस्टिगेटिंग टीम) स्थापना करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान ३० ऑक्टोबर रोजी माजलगाव व बीड शहरात काही ठिकाणी जमावाकडून तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या. यामध्ये लोकप्रतिनिधींची निवासस्थाने जाळण्यात आली. अन्य सार्वजनिक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. यासंदर्भात आमदार संदीप क्षीरसागर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
माजलगाव व बीड येथील घटनेप्रकरणी ज्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा मिळालेला आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत २७८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी ३० आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मोठे गुन्हे दाखल आहेत, असे फडणवीस म्हणाले.
अजूनही माजलगाव प्रकरणात ४० गुन्हेगार व बीड प्रकरणात ६१ गुन्हेगार फरार आहेत. त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपींचे मोबाईल लोकेशन, व्हाट्सॲप मेसेजेस तपासण्यात आले आहे. फरार आरोपी विरोधात देखील सबळ पुरावे पोलिसांकडे आहेत. हा हल्ला पूर्वनियोजित होता का? याबाबतही चौकशी करण्यात येत आहे, हे सर्व प्रकरण शासनाने गांभीर्याने घेतले असल्याचे फडणवीस म्हणाले.
बीड जिल्ह्यातील हा प्रकार अत्यंत गंभीर होता. अशा घटनांना राजकारणापलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. पोलिसांनी कारवाई केली नसती, तर ही घटना आणखी गंभीर झाली असती. जमाव जास्त व पोलिसांची कुमक कमी असल्यामुळे घटनेवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना कसरत करावी लागली. जमाव हा विखुरलेल्या स्वरूपात वेगवेगळ्या ठिकाणी होता, असे फडणवीस म्हणाले.
माजलगाव येथे आधी पोलीस कुमक गेली, त्यानंतर बीड शहरातील घटना सुरू झाली. या घटनेमध्ये चूक नसताना अटक झालेली असल्यास त्यांना बाहेर काढण्यात येईल. मात्र चूक असलेल्या कोणत्याही आरोपीला माफ केल्या जाणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य जयंत पाटील यांनी भाग घेतला.