मराठवाड्यात सरासरीपेक्षा ३६ टक्के तर विदर्भात ३२ टक्के कमी पाऊस, राज्याच्या बहुतांश जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत


मुंबईः राज्यात आधीच उशिराने आलेला पाऊस कोकण, मुंबई आणि पुण्यासह काही भागात जोरदार बरसत असताना राज्याच्या बहुतांश भागात मात्र अद्याप सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही. मराठवाड्यात सरासरीपेक्षा ३६ टक्के तर विदर्भात ३२ टक्के पावसाची तूट असून मोठ्या पावसाअभावी राज्याच्या बहुतेक जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तर चांगल पाऊस होईल म्हणून पेरण्या करून बसलेला शेतकरी दुबारपेरणीच्या चिंतेने भयभीत झाला आहे. राज्यात सरासरीपेक्षा २२ टक्के कमी पाऊस झाला आहे.

दरवर्षी जूनच्या सुरूवातीला येणारा पाऊस यावर्षी जूनच्या अखेरीस आला. आधीच उशीर झाल्याने पावसाचे आगमन होताच ज्या भागात पाऊस झाला, त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या. परंतु नंतर म्हणावा तसा पाऊस झाला नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावू लागले आहे.

कोकण आणि मराठवाड्यात जुलैच्या चांगला पाऊस झाला. मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, यवतमाळ जिल्ह्यांत जुलैच्या पहिल्या आठवड्यात आठवड्याच्या सरासरीच्या अतिरिक्त पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली असली तरी बहुतांश जून महिना कोरडाच गेल्यामुळे कोकण वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आतापर्यंत एकत्रित पाऊस सरासरीच्या खालीच आहे.

 पुण्यासह राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के कमी पाऊस झाला आहे. जालना, अकोला, हिंगोली आणि सांगली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा ६० टक्के कमी पाऊस झाला आहे. पालघर जिल्ह्यात मात्र सरासरीपेक्षा ३८ टक्के जास्तीचा पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

पुढील काही दिवस मोठ्या पावसाची शक्यता नाही

 जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने राज्यात दमदार हजेरी लावली. परंतु जून महिन्याच्या शेवटी पाऊस आल्यामुळे त्या काळातील मोठी तूट आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा खालीच आहे. देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातले असले तरी राज्याच्या बहुतेक भागात पाऊस सक्रीय नाही. पुढील काही दिवसांत मोठ्या पावसाची शक्यताही नाही, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.

…तर पर्यायी उपाययोजनांची गरज

पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे राज्याच्या अनेक भागात खरिपाचे वेळापत्रक कोलमडले आहे. परिणामी येत्या काही दिवसात मोठा पाऊस न झाल्यास कृषी विभागाला पर्यायी उपाययोजनांसाठी पावले उचलावी लागतील, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!