भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या सतरंज्या झाल्या, त्या सतरंज्यांवर उपऱ्यांचा नाचः उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल


हिंगोलीः  भाजपकडे अनेक निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांनी कुटुंबीयाकडे न पाहता पक्षासाठी आयुष्य झिजवले. परंतु आज त्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या सतरंज्या झाल्या आहेत आणि त्या सतरंज्यांवर उपऱ्यांचा नाच चालू आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने आज हिंगोलीत निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारबरोबरच हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यावरही हल्लाबोल चढवला.

 भाजपमध्ये सगळे आयाराम झाले आहेत. या पक्षातून हा घे, त्या पक्षातून तो घे. पण मला भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची दया येते. मी भाजपसोबत २५-३० वर्षे होते. भाजपकडे अनेक निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांनी कुटुंबीयाकडे न पाहता कधी तरी आपला भगवा फडकेल या आशेवर पक्षासाठी आयुष्य झिजवले. यांचा भगवा फडकलाही. पण हे राहिले दांड्यापुरते आणि भगवा फडकवताहेत दुसरेच. काय त्याचा उपयोग? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजपमध्ये निष्ठावान कार्यकर्ते आहेत, ते सतरंज्या होऊन पडलेले आहे आणि त्यावर उपऱ्यांचा नाच चालू आहे. भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना सतरंज्या म्हणून पळावे लागत आहे. एवढ्यासाठीच भाजप वाढवायला मेहनत केली का? असेही ठाकरे म्हणाले.

आताही काही गद्दार बेंडकुळ्या दाखवत आहेत. पण त्या बेंडकुळ्यात हवा आहे. जनतेची ताकद माझ्याकडे आहे. श्रावण महिना सुरू झाला आहे. मध्ये नागपंचमी झाली. या गद्दाराला नाग समजून पूजा केली. मात्र हा नाग उलटा फिरून डसायला लागला. साप पायाखाली आल्यावर काय करायचे हे तुम्हाला चांगले कळते. पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळे वाया गेले, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर हल्लाबोल केला.

नाव हिंदुत्वाचे आणि सगळे धंदे अंबादास दानवे यांनी समोर ठेवले आहेत. हे असे धंदे करणारा हिंदू म्हणवून घेऊ शकतो का? मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याला हिंदुत्ववादी म्हणायचे का? असा सवाल करतानाच कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही. तो आपल्याच लोकांवर उद्धटपणा करत असेल तर तो उद्धटपणा गाडून टाकावा लागेल, असेही ठाकरे म्हणाले.

सरकार आपल्या दारी, थापा मारतेय लई भारी!

उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही टिकास्त्र सोडले. सरकार आपल्या दारी आणि थापा मारतेय लई भारी, सगळ्या योजना कागदावरी, अशी टीका ठाकरे यांनी केली. अतिवृष्टीची मदत अजून मिळालेलीच नाही. कांद्याचा प्रश्न देखील अजून तसाच आहे. एकीकडे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे आणि दुसरीकडे डबल इंजिन, ट्रिपल इंजिन सरकार तोंडाच्या वाफा सोडतेय, असे ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!