मुंबईः संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानावरील चर्चेदरम्यान बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून देशभर निषेध केला जात आहे. अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी करत काँग्रेससह विरोधी पक्षांनी संसदेच्या आवारात जोरदार आंदोलन केले. काँग्रेसच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजप खासदारांनीही संसदेच्या आवारात आंदोलन केले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी भाजप खासदारांनी केली. या आंदोलनात भाजप नेते अशोक चव्हाण हे ‘काँग्रेसने माफी मागावी’ असा फलक हातात घेऊन सहभागी झाले होते. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि लोक अशोक चव्हाणांवर प्रश्नांची सरबत्ती करत आहेत. त्यावरूनच शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘यालाच म्हणतात खायचं कुडव्याचं आणि गायचं उडव्याचं’ म्हणत अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आहे.
अख्खी हयात काँग्रेसमध्ये घालवलेले अशोक चव्हाण नुकतेच भाजपमध्ये गेले आहेत. सध्या ते भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. ‘आता ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर… इतक्या वेळा नाव जर देवाचे घेतले असते तर त्यांना सात जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता,’ असे वादग्रस्त वक्तव्य अमित शाह यांनी केले.
शाह यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेससह इंडिया आघाडीच्या खासदारांनी अमित शाह यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी करत संसदेच्या आवारात आंदोलन केले. काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजप खासदारांनीही संसदेच्या आवारात आंदोलन केले. या आंदोलनात अशोक चव्हाण हे कांग्रेस ने किया बाबासाहेब आंबेडकर जी का अपमान’, बाबासाहेब आंबेडकर जी को दो बार चुनाव हराया, कांग्रेस माफी मांगे’ असा फलक हातात घेऊन सहभागी झाले होते. यावरून सोशल मीडियावर चव्हाणांवर टिकेची झोड उठली असतानाच शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर पोस्ट करून अशोक चव्हाणांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
अशोकरावजी हे वागणं आपल्याला शोभत नाही. यालाच म्हणतात, खायचं कुडव्याच आणि गायचं उडव्याचं. एवढा मोठा साक्षात्कार आपल्याला काँग्रेस कडून मुख्यमंत्रीपद उपभोगताना का बर झाला नाही?, सध्या आपल्याला ६६ वे वर्ष चालू आहे. वय वर्ष ६५ होईपर्यंत आपल्या दोन पिढ्या याच काँग्रेसच्या लाभार्थी राहिल्या. तेव्हा हे तत्त्वज्ञान का सुचलं नाही?, काँग्रेसने दिलेले मुख्यमंत्रीपद त्याचवेळी त्यांच्याच तोंडावर भिरकावून देत हा फलक तुम्ही किंवा तुमच्या तीर्थरूपानी हातात का घेतला नाही?, असे सवाल अंधारे यांनी केले आहेत.
ज्या काँग्रेसच्या नावाने फलक हातात घेतला आहे त्या काँग्रेसच्याच जीवावर शाळा, कॉलेज, डेअरी, डाळ मिल, ऑइल मिल, पेपर मिल, साखर कारखाने, मेडिकल कॉलेज, करोडोचे टेंडर्स, लाभाच्या जागा, पुढच्या पाच-पन्नास पिढ्यांना पुरेल एवढी जायदाद कमवल्यावर आत्ता तुम्हाला हे शेंड्यावरच शहाणपण सुचतंय का?, असा सवालही अंधारे यांनी केला आहे.
इथे मुद्दा काँग्रेसने काय केलं किंवा भाजपने काय केलं हा असूच शकत नाही. मुद्दा एका तडीपार माणसाकडून बाबासाहेबांच्या संदर्भाने झालेला उल्लेख यावर तुमची काय भूमिका आहे ते आधी सांगा, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.