मुंबईः बिग बॉस ओटीटी-२ चा विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादवच्या विरोधात रेव्ह पार्ट्या आयोजित करून तेथे येणाऱ्या लोकांना सापाचे विष आणि परदेशी तरूणी पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा शहरातील सेक्टर ४९ पोलिस ठाण्यात एल्विश विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला असून या प्रकरणी पाच जणांना अटक झाली आहे. एल्विश यादवलाही याप्रकरणी अटक केली जाण्याची शक्यता आहे. एल्विशविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे.
याच एल्विश यादवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या गणेशोत्सवात ‘वर्षा’ मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी निमंत्रित केले होते. मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणावरून एल्विश वर्षा बंगल्यावर गेला होता. तेथे त्याने गणपतीची आरतीही केली होती. मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढले होते. मुख्यमंत्र्यांसोबतचे एल्विशचे हेच फोटो शेअर करत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही शिंदे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला आहे, नशेबाज तरूणांना महाराष्ट्रातील तरूणांचे रोल मॉडेल बनवण्यात मुख्यमंत्री हातभार लावत आहेत का?, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एल्विश यादवसारख्या नशाबाजांना वर्षा बंगल्यावर बोलावून त्याचे आदरातिथ्य केले होते. शाल आणि श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला होता. महिलांबाबत अपशब्द वापरणारा, ड्रग्जची विक्री करणारा, सापाच्या विषापासून ड्रग्ज बनवणे, त्याचे सेवन करणे आणि ते विकणे असे गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. अंधारे यांनी एल्विश आणि एकनाथ शिंदेंचा गणेशोत्सवातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ‘हा एल्विश यादव. विषारी सापांसून बनवले जाणारे ड्रग्ज रेव्ह पार्टीला पुरवण्याचे गुन्हे याच्यावर दाखल आहेत. ड्रग्जशी संबंधित अनेक आरोप एल्विशवर आहेत. पण हा नेमका मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरती का करत आहे?’ असा सवाल अंधारे यांनी केला आहे.
एल्विश यादवच्या रेव्ह पार्टीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नोएडा पोलिस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी साप पकडणाऱ्या पाच गारूड्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच कोब्रा नाग आणि सापाचे विष जप्त करण्यात आले आहे. आम्ही एल्विश यादवला सापाचे विष पुरवायचो, असे अटक केलेल्या गारूड्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली असून एल्विश यादवसह पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.