पुणेः पुण्याच्या लोणी काळभोर भागातील एका नामांकित अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने आपल्याच ३६ वर्षीय प्राध्यापिकेचा न्यूड व्हिडीओ चित्रित करून तो तिला आणि तिच्या पतीला पाठवून दिला आणि नंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पाच हजार अमेरिकन डॉलरची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रध्यापिकेच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी त्या विद्यार्थ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मूळचा बिहारमधील पाटण्याचा रहिवाशी असलेला आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेला २६ वर्षीय मयांक सिंग या तक्रारदार प्राध्यापिकेचा विद्यार्थी आहे. मयंक सिंग हा इन्स्टाग्रामवर या प्राध्यापिकेच्या कायम संपर्कात असायचा. नंतर मयंक सिंग या प्राध्यापिकेला मोबाइल कॉल आणि व्हॉट्सअप व्हिडीओ कॉल करून संपर्कात राहू लागला.
एकदा मयंकने त्या प्राध्यापिकेला व्हिडीओ कॉल केला आणि सांगितले की, मी सांगितले तसे केले नाही तर आपल्यात जो काही संवाद झाला आहे, तो मी व्हायरल करेल आणि विद्यापीठात बदनामी करेल.
मयंकच्या धमकीनंतर घाबरून जाऊन पीडित प्राध्यापिका तो सांगेल तसे करायला तयार झाली. मयंकने पीडित प्राध्यापिकेला अंगावरचे कपडे काढण्यास सांगितले. प्राध्यापिकेने कपडे काढल्यानंतर त्याने तिचा न्यूड व्हीडीओ रेकॉर्ड केला.
मंयकने हा न्यूड व्हिडीओ दुसऱ्या एका आयडीवरून पीडित प्राध्यापिका आणि तिच्या पतीला पाठवून दिला. आपणास पाच हजार अमेरिकन डॉलर दिले नाही तर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्याने पीडित प्राध्यापिका आणि तिच्या पतीला दिली. रॉबिन नावाच्या आयडीवरूनही महिला प्राध्यापिकेला धमकावण्यात आले.
या धमकीमुळे घाबरलेल्या पीडित प्राध्यापिकेने पतीसह हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पीडित प्राध्यापिकेच्या फिर्यादीवरून मंयकविरुद्ध पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अशोक गंधाले हे पुढील तपास करत आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून नजीकच्या काळात सेक्स्टॉर्शनच्या घटना वाढल्या आहेत. परंतु विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात एखाद्या विद्यार्थ्याने आपल्याच प्राध्यापिकेचे सेक्स्टॉर्शन केल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे शिक्षण क्षेत्र हादरून गेले आहे. मार्च २०२० पासून २६ जून २०२३ या दरम्यान सेक्स्टॉर्शनचा हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.