छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): पंजाबच्या फिरोजपूरमध्ये मंगळवारी झालेल्या ट्रिपल मर्डर केसमधील सात खतरनाक शस्त्रसज्ज आरोपींना पंजाब पोलिसांनी दिलेल्या टिपच्या आधारे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी शनिवारी पहाटे अटक केली. पंजाबच्या गँगस्टर्स विरोधी टास्क फोर्सने (एजीटीएफ) दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे भल्या पहाटे ही धाडसी कारवाई करण्यात आली.
मंगळवारी ( सप्टेंबर) पंजाबच्या फिरोजपूरमधील बांसी गेट परिसरातील गुरुद्वारा श्री अकालगढ साहिब कंबोजनगरजवळ एकाच कुटुंबातील पाच सदस्यांवर मोटारयाकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात तीन बहीण-भावांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गोळ्या लागून जखमी झालेल्या अन्य दोन जणांवर लुधियानातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जसप्रित कौर, दिलदीप सिंह आणि आकाशदीप अशी मृतांची नावे असून त्यांच्या शरीरावर गोळ्या लागल्याच्या तब्बल ५० खुणा आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे जसप्रित कौरचा विवाह दोन दिवसांवर होता. डोक्यात गोळ्या झाडल्यामुळे या तिघांचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे.
या तिहेरी खूनानंतर पंजाब पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी ठिकठिकाणी छापेमारी सुरू केली होती. पंजाब पोलिसांचे गँगस्टर्सविरोधी टास्क फोर्स या आरोपींच्या मागावर होते. या खून प्रकरणातील सातही आरोपी महाराष्ट्रात शिरले. ते नांदेडमार्गे एमएच २६- एसी ५५९९ क्रमांकाच्या इनोव्हा कारमधून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने सुसाट निघाले होते. नांदेडपासून एजीटीएफचे हे पथक या सात आरोपींच्या मागावर होते.
शनिवारी (७ सप्टेंबर) पहाटे ३ तीन वाजता पंजाब पोलिसांच्या एजीटीएफचे अतिरिक्त महासंचालक प्रमोद बान यांनी छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी संपर्क साधला आणि अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये तातडीची मदत मागितली.
एजीटीएफने मदतीची मागणी करताच क्षणाचाही विलंब न लावता छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस दलाने सर्व तयारी केली आणि आरोपीचा मागोवा घेण्यास सुरूवात केली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या नेतृत्वातील १० अधिकारी, ४० कर्मचारी आणि क्यूआरटी पथकाने धाडसी योजना आखून पहाटे ५ वाजन ४५ मिनिटांनी समृद्धी महामार्गावरील बोगद्यात या सात आरोपींना चक्रव्यूहात अडकवले.
हे खतरनाक सातही आरोपी शस्त्रसज्ज असतानाही त्यांना अलगद आपल्या जाळ्यात अडकवले. या खतरनाक आरोपींकडून कधीही गोळ्या सुटू शकत होत्या. परंतु छत्रपती संभाजीनगरचे पोलिस अत्यंत दक्ष होते. बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये सज्ज असलेल्या छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी रणांगण गाजवत शिताफिने समृद्धी महामार्गावरील बोगद्यात या सातही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
कशी केली मोहीम फत्ते?
या सात शस्त्रसज्ज आरोपींना त्यांच्यावर पाळत असल्याचा संशय येऊ नये यासाठी पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील सावंगी येथील बोगद्यात अपघातसदृश परिस्थितीचा बनाव केला. त्यामुळे तीन बोगद्यांपैकी दोन बोगदे वाहनासाठी बंद केले. अपघातसदृश परिस्थिती निर्माण करून येणाऱ्या आवजड वाहनांना अडवून ठेवले. त्यानंतर पोलिस एका बोगद्यातून जाणार्या एक -एक वाहनांची तपासणी करत वाहने सोडत होते. पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास खबर्याने सांगितलेले संशयित वाहन तेथे आले असता समोरून बोगद्यात ट्रक उभे करून कोंडी करण्यात आली. त्यावेळी आजूबाजूला सापळा रचून बसलेल्या पथकाने आरोपीना काही कळायच्या आत त्यांच्यावर झडप घेऊन त्यांच्या इन्होवा कारच्या काचा फोडून सात आरोपीना ताब्यात घेतले.
या सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, १०९, ३५१(२), १९१(३), १९०, ६१(२) आणि शस्त्र कायद्याच्या कलम २५(६) व २५(७) अन्वये फिरोजपूर पोलिसांत गुन्हे दाखल आहेत.
एजीटीएफकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त कारवाईत सात आरोपींना अटक करण्यात आली. तर अन्य एका आरोपीला स्थानिक पोलिसांनी आधीच अटक केलेली आहे, असे फिरोजपूरच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षक सौम्या मिश्रा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. छत्रपती संभाजीनगरहून (औरंगाबाद) आरोपींना आणण्यासाठी पंजाब पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. खूनामागचा हेतू आणि अन्य संशयित आरोपींबद्दलची माहिती लवकरच दिली जाईल, असे मिश्रा म्हणाल्या.