
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): समाज कल्याण विभागाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा जातपडताळणी समितीच्या उपायुक्त जयश्री रावण सोनकवडे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक उपायुक्तपदी असताना गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन, शिस्तभंग, अनियमितता आणि पदाचा दुरूपयोग करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियमांचेही उल्लंघन केल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यामुळे आणि बदलीनंतरही त्यांचे गैरवर्तन सुरूच राहिल्यामुळे सोनकवडे यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने समाज कल्याण आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे आपण चर्मकार समाजातील महिला असल्यामुळेच जातीय दृष्टिकोन ठेवून आपल्यावर अन्याय करण्यात आल्याचा कांगावा करणाऱ्या सोनकवडेंना जोरदार चपराक बसण्याची शक्यता आहे.
जयश्री रावण सोनकवडे यांची २४ मार्च २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक उपायुक्तपदावरून छत्रपती संभाजीनगर जिल्हा जातपडताळणी समितीच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली. या बदली आदेशाला त्यांनी २५ मार्च रोजी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) आव्हान दिले. मॅटमध्ये आपल्याला अंतरिम दिला मिळेल, अशी अपेक्षा ठेवून त्या जवळपास महिना सव्वामहिना वाट पहात राहिल्या. सोबतच ही बदली रद्द करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत राहिल्या. परंतु मॅटने कोणताच दिलास न दिल्यामुळे सोनकवडे या जिल्हा जातपडताळणी समितीच्या उपायुक्तपदी ५ मे २०२५ रोजी रूजू झाल्या.
जयश्री सोनकवडेंनी मॅटमध्ये दाखल केलेल्या रिजॉइंडरच्या प्रत्युत्तरादाखल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ६ ऑगस्ट रोजी मॅटमध्ये दाखल केलेल्या शपथपत्रात जयश्री सोनकवडे यांच्या काळ्या कारनाम्यांचा जंत्रीच देण्यात आली आहे. आपला बदली आदेश बेकायदेशीर, दुर्भावनायुयक्त किंवा राजकीय हेतुने प्रेरित असल्याचा सोनकवडे यांचा दावा सामाजिक न्याय विभागाने फेटाळून लावला असून त्यांची बदली प्रशासकीय गरजेनुसार आणि प्रचलित नियमांनुसारच करण्यात आल्याचा दावाही केला आहे.
पदाचा दुरुपयोग रोखण्यासाठी बदली
सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी आपल्याविषयी केलेल्या तक्रारींची कोणतीही चौकशी झालेली नाही, असा दावा जयश्री सोनकवडे यांनी रिजॉइंडरमध्ये केला. त्यांचा हा दावा असंबद्ध आणि तकलादू असून त्यांचे वर्तन शासकीय सेवकासाठी अयोग्य आहे. त्यामुळे चौकशीच्या कार्यवाहीत हस्तक्षेप होण्याची शक्यता असल्यामुळे जयश्री सोनकवडे यांना पद आणि अधिकाराचा गैरवापर करण्यापासून रोखण्यासाठीच त्यांची बदली करणे अनिवार्य ठरले, असे सामाजिक न्याय विभागाने म्हटले आहे.
गंभीर गैरवर्तनाची पुष्टी
जयश्री सोनकवडे यांनी केलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी असंख्य तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशी समितीच्या अहवालात जयश्री सोनकवडे यांनी गंभीर वर्तन केल्याची पुष्टी झाली आहे. हा चौकशी अहवाल मॅटकडे आधीच सादर करण्यात आला आहे, असेही या मिळाल्याचेही या शपथपत्रात म्हटले आहे. आपल्या एकापेक्षा जास्त चौकश्या सुरू असल्याचा सोनकवडे यांचा दावाही या शपथपत्रात फेटाळून लावण्यात आला आहे.
बदलीनंतरही गैरवर्तन सुरूच
जयश्री सोनकवडे यांची छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक उपायुक्तपदावरून जिल्हा जातपडताळणी समितीच्या उपायुक्तपदी बदली झाल्यानंतरही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. सोनकवडे यांनी बदलीनंतरही फेसबुकवर पोस्ट करून सार्वजनिकरित्या आक्षेपार्ह विधाने केली आहेत. ‘मी चांभार समाजाची असल्यामुळे काही दडपशाही तत्वांनी माझ्याविरुद्ध खोट्या तक्रारी करून कट रचला आहे. एका प्रभावशाली जातीतील पुरूष अधिकाऱ्याची माझ्या जागी सोयीस्करपणे बदली करण्यात आली आहे,’ अशा आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट सोनकवडे यांनी केल्या. त्यांचे शिस्तभंग आणि अयोग्य वर्तनच त्यांच्या बदलीसाठी कारणीभूत असून सोनकवडे यांनीच सामाजिक भेदभाव निर्माण करणाऱ्या टिप्पणी केल्याचा दावा या शपथपत्रात करण्यात आला आहे.
महिला कामगारांचा घरगड्यासारखा छळ
जयश्री सोनकवडे यांनी शासकीय वसतिगृहांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी महिला कामगारांना घरगड्यासारखे राबवून त्यांचा छळ केल्याचा गौप्यस्फोट न्यूजटाऊनने ७ जुलै २०२५ रोजी केला होता. त्या बातमीची दखलही या शपथपत्रात घेण्यात आली आहे. जयश्री सोनकवडे यांनी महिला कर्मचाऱ्यांना शरीराची मालिश करणे, शौचालय आणि स्नानगृह धुणे, आईची काळजी घेणे आणि सर्व घरगुती कामे विनामूल्य बळजबरीने करून घेतली. नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देऊन आणि या महिला कर्मचाऱ्यांना अपमानित करून त्यांनी हा प्रकार केला. शासकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांचा खासगी कामासाठी वापर हा सार्वजनिक संसाधनांचा गैरवापर आणि महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाचे उल्लंघन असल्याचेही या शपथपत्रात म्हटले आहे.
सोनकवडेंनी दिले नवऱ्यालाच टेंडर?
जयश्री सोनकवडे यांनी पद आणि अधिकाराचा दुरुपयोग करून त्यांच्या नवऱ्यालाच निविदा वाटप केल्याचा गंभीर आरोप आहे. हे तथ्य स्थापित करणे कठीण असले तरी निविदा प्रक्रियेचे पालन करूनच शासकीय वसतिगृहाचा भोजन ठेका देण्यात यावा, असे स्पष्ट लेखी आदेश ६ मे २०२२ रोजी देऊनही जयश्री सोनकवडे यांनी निविदा प्रक्रियेचे पालन न करताच २१ मे २०२४ रोजी बीडच्या कन्हैय्या एंटरप्रायझेसला स्वतःच्या अधिकारात आदेश काढून भोजन ठेका दिल्याचा गंभीर आरोप या शपथपत्रात करण्यात आला आहे.
शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव
कोणत्याही शासकीय सेवकाला विशिष्ट पदावर किंवा विशिष्ट ठिकाणी राहण्याचा अधिकार नाही. बदली ही सेवेची एक घटना आणि प्रशासकीय शिस्तीचा भाग आहे. सोनकवडे यांची बदली त्याच विभागात आणि त्याच कार्यालय परिसरात करण्यात आली असल्यामुळे त्यांच्यावर कोणताही अन्याय झाला नाही, असे सांगतानाच जयश्री सोनकवडे यांनी केलेले गंभीर वर्तन, अनियमितता, पद आणि पदाचा केलेला दुरूपयोग याबाबतच्या प्राप्त तक्रारी आणि चौकशी समितीच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर जयश्री सोनकवडे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाने समाज कल्याण आयुक्तांना दिल्याचेही या या शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जयश्री सोनकवडे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

