
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची भाषा अनेक संघटना आणि राजकीय नेत्यांकडून केली जात असतानाच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीजवळ बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली असून एसआरपीएफची एक तुकडी आणि दोन अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
खुलताबादेतील औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर उडखून फेकण्यात यावी, अशी मोहीम शिवजयंतीपासून हाती घेण्याची घोषणा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केली आहे. औरंगजेबाची कबर हटवा, अन्यथा बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करू, असा इशाराच या हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे.
हिंदुत्ववादी संघटनांच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीजवळील पोलिस बंदोबूस्तात अचानक मोठी वाढ करण्यात आली आहे. राज्य राखीव दलाची (एसआरपीएफ) एक तुकडी आणि दोन अधिकारी कबरीजवळ तैनात करण्यात आले आहेत. एसआरपीएफच्या या तुकडीत १५ पोलिस कर्मचारी आहेत. कबर परिसराकडे जाताना दोन ठिकाणी फिक्स पाँइट उभारण्यात आले असून या ठिकाणी नाकाबंदी केली जात आहे.
खुलताबादेत येणारे पर्यटक औरंगजेबाच्या कबरीलाही भेट देतात. आता कबरीकडे जाणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी केली जात आहे. तपासणीनंतरच त्यांना कबरीकडे सोडले जात आहे. काही पोलिस साध्या वेषातही तैनात करण्यात आले असून ते परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजिक शांतता धोक्यात येऊ नये म्हणून पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून विधाने केली आहेत. खुलताबादेतील औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची भाषाही काही राजकीय नेत्यांनी केली आहे.
राजकीय नेते आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून वातावरण पेटवले जात असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून औरंगजेबाच्या कबर परिसरात एसआरपीएफची एक तुकडी, १५ पोलिस कर्मचारी आणि दोन पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
औरंगजेबाची कबर आमच्या गुलामगिरीची, लाचारीची आणि अत्याचारांची आठवण करून देते. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर ही कबर हटवावी अन्यता बजरंग दल, स्वाभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल, असा इशारा बजरंग दलाने दिला आहे. औरंगजेबाची कबर हटवली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही बजरंग दलाने दिला आहे. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांना ५ एप्रिलपर्यंत छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कशासाठी पाहिजे औरंगजेब तुम्हाला?: शिरसाट
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. औरंगजेबाची कबर इथे नको. कशासाठी पाहिजे? तो त्रास आम्हाला कशाला पाहिजे? एक राजा तिकडून येतो काय, इथल्या हिंदूंची मंदिरे पाडतो काय, महिलांवर अत्याचार करतो काय, अनेक लोकांना छळतो काय, त्याने गरम सळया टाकून संभाजी राजांचे डोळे काढले, नखे काढली. ४० दिवस हालहाल करून मारले. त्याची आठवण आम्हाला कशाला पाहिजे? कशासाठी पाहिजे औरंगजेब तुम्हाला इथे? असे सवाल संजय शिरसाट यांनी केले आहेत.
कबर हटवण्यास काँग्रेसचा विरोध
काँग्रेसने मात्र औरंगजेबाची कबर हटवण्यास विरोध केला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्वाजल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने स्टंटबाजी करू नये. औरंगजेब जेवढा क्रूर होता, तेवढ्याच क्रूरपणे महाराष्ट्रातील फडणवीस सरकार वागत आहे. घाशीराम कोतवालाप्रमाणे गृह विभाग चालवला जात आहे. औरंगजेबाची कबर वीरत्वाची कबर नाही तर ती क्रूपणाची कबर आहे. त्यामुळे ती कबर शिवाजी महाराजांच्या ज्वाजल्य इतिहासाची साक्ष आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
कबरीला हात न लावणेच योग्यः आ. पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनीही औरंगजेबाची कबर हटवण्यास विरोध केला आहे. औरंगजेबासारखी एक बलाढ्य शक्ती होती. त्याच्याकडे प्रचंड पैसा, मनुष्यबळ, हत्ती-घोडे होते. इतकी मोठी ताकद असलेल्या माणसालासुद्धा या महाराष्ट्रात २७ वर्षे रहावे लागले आणि तरीही त्याला महाराष्ट्रावर राज्य करता आले नाही. त्याचे प्रतिक औरंगजेबाची कबर आहे. त्या प्रतिकाला आज काढून उद्या त्याबाबतीत चर्चा झाली नाही, तर उद्या जाऊन लोक इतिहासात काहीतरी गडबड करू शकतात. त्यामुळे त्याचे प्रतिक म्हणून त्या कबरीला हात न लावणेच अधिक योग्य ठरू शकते, असे आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे.