अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी तब्बल ४२ उमेदवारांच्या ११ जानेवारीला मुंबईत मुलाखती; वाचा कोण कोण स्पर्धेत?


अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी स्थापन केलेल्या शोध समितीने या पदासाठी आलेल्या अर्जांतून ४२ उमेदवार शॉर्टलिस्ट केले आहेत. कुलगुरू शोध समिती येत्या ११ जानेवारीला या ४२ उमेदवारांच्या मुंबईत मुलाखती घेणार आहे.

अमरावती विद्यापीठाचे कुलगुरूपद जानेवारी महिन्यापासून रिक्त आहे. या विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्र. गो. येवले यांच्याकडे सोपवण्यात आला होता. परंतु डॉ. येवले यांचा कार्यकाळ येत्या ३१ डिसेंबरला संपत आहे.

राज्यपाल तथा महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी स्थापन केलेल्या कुलगुरू शोध समितीने अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अर्ज मागवले होते. शोध समितीने या अर्जांची छानणी करून ४२ उमेदवार शॉर्टलिस्ट केले आहेत. या उमेदवारांच्या मुलाखती येत्या ११ जानेवारीला मुंबईत घेतल्या जाणार आहेत.

शोध समितीने शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांमध्ये  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील तीन प्राध्यापकांचा समावेश आहे. त्यात संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक डॉ. मोहम्मद अतिक, जैवतंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. प्रसाद वाडेगावकर आणि विधी विभागातील प्राध्यापक डॉ. विजयकुमार चौबे यांचा समावेश आहे.

कुलगुरूपदाच्या शर्यतीत यवतमाळ जिल्ह्यातील दोन उमेदवारही आहेत. त्यात यवतमाळच्या अमोलकचंद महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. अजय लाड, आणि डॉ. सुहास पाटील यांचा समावेश आहे.

 शोध समितीने मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या अन्य उमेदवारांमध्ये जळगावच्या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्कूल ऑफ केमिकल सायन्सचे प्रा. डॉ. प्रमोद माहुलीकर, पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदेश जाडकर, याच विभागातील डॉ. संजय ढोले, जैवतंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. राजू गच्छे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. विजय फुलारी, छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. वैशाली खापर्डे यांचा समावेश आहे.

शॉर्टलिस्ट उमेदवारांच्या नावांबाबत लपवाछपवी

कुलगुरू शोध समितीने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांमधून ४२ उमेदवार शॉर्टलिस्ट करून त्यांना मुलाखतीसाठी पाचारण केले आहे. परंतु शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या नावांबाबत कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाच्या कुलगुरू शोध समितीने शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. मग अमरावती विद्यापीठासाठीची शोध समिती शॉर्टलिस्ट केलेल्या नावांबाबत गोपनीयता का पाळत आहे? शोध समितीला नेमके कोणाचे नाव लपवायचे आहे? असा सवाल केला जाऊ लागला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!