ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर


मुंबई: गुजरातमधील स्टॅच्यु ऑफ यूनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासह अनेक महापुरूषांचे पुतळे घडवणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत. त्यांचे वय सध्या १०० वर्ष असून अजूनही ते शिल्प तयार करण्याचे काम करीत आहेत. इंदू मिल येथे निर्माणाधीन असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती तयार करण्याचे कामही राम सुतार करीत आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या पुरस्कार निवडीबाबत १२ मार्च २०२५ रोजी निवड समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राम सुतार यांचे नाव २०२४ च्या पुरस्कारासाठी मान्यता देण्यात आली. या पुरस्कारचे स्वरूप २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असे आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर या छोट्याश्या गावात एका गरीब कुटुंबात झाला. त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून आपले शिक्षण पूर्ण केले. काही काळ सरकार नोकरी केल्यानंतर राम सुतार यांनी १९६० पासून आपला स्वतंत्र स्टुडिओ उभारला.

राम सुतार यांनी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, जगजीवनराम, सुभाषचंद्र बोस अशा अनेक दिग्गज नेत्यांचे पुतळे उभारले आहेत. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ फुटी पुतळा राम सुतार यांनीच उभारला. मुंबईतील अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि इंदू मिल येथे डॉ. आंबेडकर स्मारकातील शिल्पेही राम सुतार यांच्याच कल्पनेतून साकारत आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!