राज्यातील शाळांमध्ये प्रत्येक शनिवारी राबवणार ‘दप्तरमुक्त आनंददायी शनिवार’ उपक्रम, शाळांमध्ये माता-पालक मेळावे घेणे बंधनकारक


मुंबई राज्यातील शाळांमध्ये प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी शुक्रवारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) आढावा बैठकीत दिले. शाळांमध्ये माता-पालक मेळावे घेणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची (डायट) आढावा बैठक शुक्रवारी दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, डायटचे संचालक हेमंत वसेकर, संचालक विठ्ठल कांबळे, सहसंचालक कमलादेवी आवटे यांच्यासह डायटचे अधिकारी, प्राचार्य उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हास्तरीय डायटचे प्राचार्य उपस्थित होते.

राज्यात प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्यात यावा. यामध्ये मुलांना योग, कवायत, देशभक्ती वाढीस लागण्यासाठी प्रयत्न, प्रबोधनासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावेत. मुलींसाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे, कला-क्रीडा यावर भर द्यावा. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये नेतृत्वगुण, धाडस निर्माण होण्यासाठी मराठी आणि इंग्रजीमध्ये संवाद साधण्यास, भाषणास प्रवृत्त करावे, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राज्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. वर्षभरात साडेसहा ते सात लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची बाब कौतुकास्पद आहे. शिक्षणाच्या बाबतीत डायटच्या (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम, यशोगाथा राज्यभर राबवले जावेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाच्या गुणवत्तेचा अभ्यास करून राज्यासाठी बेंचमार्क ठरवावा, असे भुसे म्हणाले.

शिक्षकांचे उपक्रम समाजासमोर आणाः  ‘डायट’ने विद्यार्थ्यांची प्रगती, गुणवत्ता सुधारण्यासाठी दुवा म्हणून काम करावे. सामूहिक जबाबदारीने संवाद, समन्वय साधून अपेक्षित काम पूर्ण करावे. राज्यातील शिक्षक आपल्या स्तरावर विविध उपक्रम राबवत असतात ते समाजासमोर यावेत. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी आवड निर्माण होण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुकास्तरावर कविता, निबंध स्पर्धांचे आयोजन करावे. कविता शिकवताना वेगळी चाल लावून दिल्यास विद्यार्थी त्वरित आत्मसात करतात. राज्यातील इतर माध्यमांच्या शाळांसाठी मराठीचा योग्य, सुलभ अभ्यासक्रम निवडा. दुसरीच्या पाठ्यपुस्तकात यंदा बदल करण्यात येणार असून पुस्तके बिनचूक प्रकाशित होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

शाळेत मातापालक मेळावा बंधनकारक: प्रत्येक शाळेने वार्षिक कामकाज कॅलेंडरमध्ये माता-पालक मेळावा घेणे बंधनकारक करावे. त्या कार्यक्रमांचे जिओ टॅगिंग फोटो, व्हिडीओ शालेय शिक्षण आणि डायटच्या वेबसाईटवर अपलोड करावेत. प्रत्येक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. मुलांना अभ्यासाबरोबर समाजातील गोष्टीचे ज्ञान होण्यासाठी भाजी बाजार, बँकेचे कामकाज, विविध वाहनांच्या दुरूस्ती कार्याबाबत उपक्रम राबवावेत. यावर्षीही १५ जूनला शाळा प्रवेशावेळी मुलांच्या स्वागताचे कार्यक्रम घेण्याचे निर्देश भुसे यांनी दिले.

लोकसहभाग वाढवून लोकचळवळ करा: राज्यात विविध शाळा ग्रामस्थांच्या सहभागाने प्रगतीपथावर आहेत. भौतिक सुविधा, प्रशिक्षण, ज्ञानदान समर्पित भावनेने शिक्षकांनी करावे, मात्र शाळांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवून लोकचळवळ तयार करावी. माजी विद्यार्थी संघांना समाविष्ट करून घ्यावे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात अग्रेसर असलेल्या शाळांना इतर शाळांची प्रगती होण्यासाठी आसपासच्या शाळांची जबाबदारी देवून त्या शाळा आदर्श कराव्यात, असे निर्देशही भुसे यांनी केली दिले.

गरदरेवाडी शाळेचा आदर्शः दौंड तालुक्यातील गरदरेवाडीच्या शाळेने लोकसहभागातून आंतरबाह्य बदल केले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी ही शाळा प्रयत्नशील आहे, याठिकाणी २२ मार्चचा कार्यक्रम यू-ट्यूबवरून थेट प्रसारित करण्यात येणार आहे. या शाळेचा आदर्श घेवून १२५ गावांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भुसे यांनी दिली.

डायटमध्ये होणार लवकरच पदभरतीः ‘डायट’च्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पदभरतीबाबत आकृतीबंध वित्त विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविला असून पदभरतीचे प्रस्ताव पाठवावेत, असे प्रधान सचिव देओल यांनी यावेळी सांगितले. यावेळी संचालक वसेकर यांनी डायटमार्फत केल्या जात असलेल्या कामांची, उपक्रमाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!