छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूकः ९ प्रभागांतील ३६ नगरसेवकांचा निर्णय अनुसूचित जातीच्या मतदारांच्या हाती, तेच ठरवणार ‘घडले-बिघडले’चे गणित!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): प्रभाग पद्धतीनुसार होत असलेली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सध्याची निवडणूक धक्कादायक निकाल देणारी आणि सगळ्यांचेच आडाखे चुकवणारी ठरण्याची शक्यता आहे. या प्रभाग पद्धतीमुळे क्रॉस व्होटिंग होण्याचाच जास्त धोका असल्यामुळे ज्यांनी हा प्रभाग रचनेचा खटाटोप करून एक हाती सत्तेचे स्वप्न पाहिले, त्यांचे स्वप्नही झोपेतच विरण्याची शक्यता राजकीय विश्लेषक बोलून दाखवू लागले आहेत. अशात एकूण २९ प्रभागांपैकी ९ प्रभागांमध्ये अनुसूचित जातीच्या मतदारांचे प्राबल्य असून या मतदारांचा निर्णयच महापालिकेच्या सत्तेच्या सोपानाचे गणित ‘घडवणार-बिघडवणार’ आहे.

प्रभाग पद्धतीनुसार होत असलेल्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. प्रभाग कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो? याची स्पष्ट कल्पनाच आली नसल्यामुळे एका प्रभागातील उमेदवारांच्या प्रचार रॅली अनेकदा दुसऱ्याच प्रभागातील मतदारांना मतदानाचे आवाहन करताना दिसून आल्या आहेत.

 या निवडणुकीत एका मतदाराला चार उमेदवारांना मतदान करायचे असल्यामुळे एक मतदार मतदानासाठी किमान पाच ते सात मिनिटांचा वेळ घेण्याची शक्यता आहे. कोणत्याही मतदाराला ‘झालं का तुझं? निघ बाहेर’ असे मतदान केंद्र अधिकारी म्हणू शकणार नाही. जो मतदार त्याला हवा तेवढा वेळ घेईल म्हणजे मतदन प्रक्रिया संथ चालेल. परिणामी मतदान केंद्राबाहेर रांगा लागतील. त्या पाहून अनेकजण मतदान न करताच निघून जाण्याचीही शक्यता आहे. परिणामी या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षाही कमी असेल. कमी मतदान झाले त्याचा सत्ताधाऱ्यांना फायदा होतो, हे गृहितक ही निवडणूक चुकवणारी असेल.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या या निवडणुकीत निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला किमान ८,५०० ते ९,००० मते मिळवावी लागतील, असे राजकीय पक्षांचे नेते आणि राजकीय विश्लेषकही सांगू लागले आहेत. त्यामुळे ज्या प्रभागात ज्या मतदारांचे प्राबल्य आहे, त्यांच्यावरच प्रभाग पद्धतीचे गणित समजून घेतलेल्या उमेदवारांचा फोकस राहिला आहे. तर ज्या उमेदवारांना हे गणितच लक्षात आले नाही, त्यांचा प्रचार हवेतच उडत गेल्यासारखे होण्याचीच दाट शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मूळ प्रारुप मतदार यादीनुसार प्रभाग रचना अंतिम करण्यात आली आहे. या अंतिम प्रभाग रचनेत एकूण मतदार, अनुसूचित जातीचे मतदार आणि अनुसूचित जमातीच्या मतदारांची संख्या देण्यात आली आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत प्रभागनिहाय मतदारांच्या एकूण संख्येत वाढ किंवा घट नोंदली गेली आहे. तशी ही वाढ-घट अनुसूचित जातीच्या मतदारांच्या संख्येतही असू शकते. परंतु प्राबल्य मात्र कायम आहे.

मात्र प्रभाग रचना अंतिम करतेवेळेसची मतदारसंख्या पाहता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या एकूण २९ प्रभागांपैकी ९ प्रभागांत अनुसूचित जातीच्या मतदारांचेच प्राबल्य असून हे मतदार ठरवतील तेच उमेदवार निवडून येतील, एवढी मोठी त्यांची संख्या आहे. तर उर्वरित ७ प्रभागांमध्येही ८,६३६ ते ६,५१० पर्यंत मतदार संख्येने असलेल्या अनुसूचित जातीच्या मतदारांची भूमिका निर्णायक राहणार आहे.

अनुसूचित जातीच्या मतदारांचे प्राबल्य असलेले ९ प्रभाग

  • प्रभाग क्रमांक-२४: अनुसूचित जातीचे मतदार- १९,३३८
  • प्रभाग क्रमांक-२८: अनुसूचित जातीचे मतदार- १७,७५७
  • प्रभाग क्रमांक-९: अनुसूचित जातीचे मतदार- १६,७०२
  • प्रभाग क्रमांक-४: अनुसूचित जातीचे मतदार- १४,३९०
  • प्रभाग क्रमांक-३: अनुसूचित जातीचे मतदार- १३,५५४
  • प्रभाग क्रमांक-८: अनुसूचित जातीचे मतदार-१२,७२३
  • प्रभाग क्रमांक-१८: अनुसूचित जातीचे मतदार- १०,६९०
  • प्रभाग क्रमांक-१:  अनुसूचित जातीचे मतदार- ९,५३४
  • प्रभाग क्रमांक-२०: अनुसूचित जातीचे मतदार-  ९,३६६

या ७ प्रभागांतही निर्णायक भूमिका

  • प्रभाग क्रमांक-५: अनुसूचित जातीचे मतदार- ८,६३६
  •  प्रभाग क्रमांक-२६: अनुसूचित जातीचे मतदार- ८,५५६
  • प्रभाग क्रमांक-२५:  अनुसूचित जातीचे मतदार- ७,९६२
  • प्रभाग क्रमांक-१९: अनुसूचित जातीचे मतदार- ७,४५०
  • प्रभाग क्रमांक-२९:  अनुसूचित जातीचे मतदार- ७,३५२
  • प्रभाग क्रमांक-२७: अनुसूचित जातीचे मतदार-  ७,२९९
  • प्रभाग क्रमांक-२२: अनुसूचित जातीचे मतदार- ७,१९९
  • प्रभाग क्रमांक ६:  अनुसूचित जातीचे मतदार- ६,७१५
  • प्रभाग क्रमांक-१७: अनुसूचित जातीचे मतदार- ६,५१०
संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!