मुंबईः बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सोमवारी रात्री ४५ मिनिटे बंद दाराआड चर्चा केली. अजितदादांच्या या भेटीत कामकाजाच्या आढाव्याबाबत चर्चा झाली, बीड घटनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. मात्र या भेटीत धनंजय मुंडे यांनी अजितदादांकडे मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केल्याची चर्चा रंगली आहे.
अजित पवार हे परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर सोमवारी रात्री मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे ४५ मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. अजित पवारांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण आलो होतो, असे मुंडे यांनी या भेटीनंतर सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तपासानंतर जे काही समोर येईल, त्यानंतर आम्ही ठरवू. लोकशाहीत प्रत्येकालाच आरोप करण्याचा अधिकार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करणार आहेत, असे धनंजय मुंडे यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
या भेटीत मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केल्याचे बोलले जाते. मात्र अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारलेला नाही. पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याचे सांगण्यात येते.
संतोष देशमुख हत्येची विशेष चौकशी पथक, बीड पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याशिवाय न्यायालयीन चौकशीचीही घोषणा झाली आहे. जेव्हा केव्हा चौकशीत नाव समोर येईल तेव्हा कारवाई करू, असे सांगत अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिल्याचे समजते.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. पवनचक्की उभारणाऱ्या आवादा कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी वसूल केली जात होती. सरपंच संतोष देशमुख यांनी त्याला विरोध केला होता. अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर ही खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हाही दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादानेच वाल्मिक कराड ही खंडणी मागत होते, संतोष देशमुख हत्या प्रकरणातही वाल्मिक कराडचाच हात असून धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडला संरक्षण देत असल्याचा आरोप केला जात आहे.