जबलपूरः ‘गीदड की खाल ओढकर कोई शेर नहीं बन सकता’ असे सांगत बागेश्वरधाम पीठाचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी शिर्डीचे साईबाबा यांना ईश्वर मानण्यास नकार दिला आहे. आमच्या शंकराचार्यांनी साईबाबांना ईश्वराचे स्थान दिलेले नाही, असेही ते म्हणाले. धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
धीरेंद्रकृष्ण शास्त्री हे नेहमीच आक्षेपार्ह वक्तव्य करून वाद ओढवून घेत असतात. जबलपूर येथे भागवत गीतेचे पारायण करताना त्यांनी १ एप्रिल रोजी शिर्डीचे साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
जबलपूरच्या या भागवत गीता पारायणात साईबाबांची पूजा करावी की नाही? असा प्रश्न धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना गीदड की खाल ओढकर कोई शेर नही बन सकता (गिधाडाची चामडी पांघरूण कोणी सिंह बनू शकत नाही) असे धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले.
आमच्या शंकाराचार्यांनी साईबाबांना ईश्वराचे स्थान दिलेले नाही. शंकराचार्य यांचे मत मानणे अनिवार्य आहे. त्यांच्या मताचे पालन करणे प्रत्येक सनातनी व्यक्तीचे कर्तव्य आहे. कारण ते धर्माचे प्रधानमंत्री आहेत. कोणतेही संत आपल्या धर्माचे असो की दुसऱ्या, त्यांना ईश्वराचे स्थान देता येणार नाही, असेही धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले.
गिधाडाची चामडी पांघरूण कोणी सिंह बनू शकत नाही. याला लोक वादग्रस्त वक्तव्य म्हणतील, पण हे बोलणे खूप गरजेचे आहे. मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण हे बोलणेदेखील गरजेचे आहे. कोणतेही संत ते तुलसीदास असो, सूरदास असो किंवा इतर कोणतेही संत असोत. ते केवळ महापुरूष आहेत, युगपुरूष आहेत. परंतु ते ईश्वर नाहीत. आपण साईबाबांना संत म्हणू शकतो, फकीर म्हणू शकतो, पण ईश्वर नाही, असेही धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले.