
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर वर्णव्यवस्थेविरुद्ध लढा दिला, त्याच बाबासाहेबांच्या नावे असलेल्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात शुद्रातिशुद्रांसह महिलांविषयी अतिशय गलिच्छ भाष्य करणारे ‘उपनिषद’ हे पुस्तक उपराष्ट्रपतींना भेट का दिले? मनुस्मृतीचा पुरस्कार करणारी पुस्तके पाहुण्यांना भेट देऊन तुम्हाला त्या विचारसरणीचा पुन्हा पायरोव करायचा आहे काय? असे सवाल करत शनिवारी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत अधिसभा सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे छुप्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आरएसएसप्रणित ‘हिंदुत्वा’चा अजेंडा चालवणाऱ्या प्रशासनाची चांगलीच गोची झाली. अखेर सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने सपशेल माफी मागितली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची शनिवारी झालेली अर्थसंकल्पीय बैठक वादळी ठरली ती २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांना कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी ‘उपनिषद’ हे पुस्तक भेट दिल्याच्या आणि बैठकीआधी अधिसभा सदस्य डॉ. उमाकांत राठोड यांना बेगमपुरा पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईची नोटीस दिल्याच्या मुद्यावरून! दीक्षांत समारंभात कुलगुरू डॉ. फुलारी यांनी उपराष्ट्रपती धनखड यांना ‘उपनिषद’ हे पुस्तक भेट देऊन वैदीक ब्रह्मविद्येचे खुलेआम उदात्तीकरण केल्याचे वृत्त न्यूजटाऊनने २७ फेब्रुवारी रोजी दिले होते. त्याच मुद्यावरून अधिसभा सदस्यांनी कुलगुरूंसह विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले.
अधिसभेची बैठक सुरू होताच डॉ. नरेंद्र काळे यांनी अधिसभा सदस्य डॉ. उमाकांत राठोड यांना बेगमपुरा पोलिसांनी बैठकीच्या एक दिवस आधी बजावलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिशीचा मुद्दा उपस्थित केला. अधिसभा सदस्याला नोटीस देणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असून ही अतिशय गंभीर बाब आहे. विद्यापीठाच्या इतिहासात असा प्रकार घडला नाही, असे डॉ. नरेंद्र काळे म्हणाले.
फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारसरणीला मारक गोष्टी आम्ही सहन करणार नाही, असे प्रा. सुनिल मगरे म्हणाले. डॉ. अंकुश कदम, डॉ. संजय कांबळे, डॉ. भारत खैरनार, प्रा. हरिदास सोमवंशी, डॉ. मुंजा धोंडगे यांनीही या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली. पोलिसांनी डॉ. राठोड यांना नोटीस द्यावी यासाठी विदयापीठ प्रशासनाने कार्यवाही केली नसल्याचे सांगत कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तरीही सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून कुलगुरू डॉ. फुलारी यांनी दिलगिरी व्यक्त केली.
प्रा. सोमवंशी यांनी कुलगुरूंनी नव्हे तर कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या माफीची मागणी केली. डॉ. कांबळे यांनी कुलसचिवांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. त्यानंतर कुलसचिव डॉ. अमृतकर यांनीही सभागृहाची माफी मागितली. या माफीनाम्यानंतर कुलगुरूंनी सभागृहाचे कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व सदस्यांनी नोटीस पाठीमागे घेतल्याचे पत्र आल्याशिवाय कामकाज सुरुवात होणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे कुलगुरू डॉ. फुलारींनी पोलिस प्रशासनाशी सभागृहातूनच संपर्क साधत नोटीस मागे घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर काही वेळातच नोटीस मागे घेतल्याचे पत्र प्राप्त झाले आणि सभागृहाचे कामकाज सुरू झाले.
मनुस्मृतीचा पुन्हा पायरोव करायचा काय?
सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर डॉ. उमाकांत राठोड यांनी दीक्षांत सोहळ्यात उपराष्ट्रपतींना ‘उपनिषद’ हे पुस्तक भेट दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. उपनिषदांमध्ये वर्णव्यवस्था असून शुद्रातिशुद्रांसह महिलांविषयी अतिशय गलिच्छ लिहिलेले आहे. त्यात मनुस्मृतीचा पुरस्कार केलेला आहे. त्या मनुस्मृतीचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले. त्यांच्याच नावाच्या विद्यापीठाचे प्रशासन त्या विचारसरणीचा पुरस्कार करणारे ग्रंथ पाहुण्यांना भेट देते. ही गंभीर बाब आहे. आंबेडकरी चळवळीचा आणि पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान आहे. उद्या तुम्ही नथुराम गोडसेंचाही पुतळा उभारणार का?, असे डॉ. राठोड म्हणाले.
कुलगुरू म्हणालेः माझा नव्हे, समितीचा निर्णय
पाहुण्यांना ग्रंथ देण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीत परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी, मराठी विभागाचे प्रमुख डॉ. दासू वैद्य आणि प्रा. डॉ. मुस्तजिब खान यांचा समावेश होता. समितीनेच पाहुण्यांना ‘उपनिषद’ हे पुस्तक भेट देण्याची सूचना केली. समितीची सूचना मी मान्य केली आणि उपराष्ट्रपतींना उपनिषद हे पुस्तक भेट दिले. समितीच्या निर्णयात माझा हस्तक्षेप नसतो, असे कुलगुरू डॉ. फुलारी म्हणाले आणि प्रश्नाचे उत्तर देण्याच्या सूचना त्यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांना दिल्या.
होकेंचा ‘योग’ उपनिषदाच्या बाजूने
उपराष्ट्रपतींना ‘उपनिषद’ हे पुस्तक भेट दिल्यामुळे सभागृहात वादळी चर्चा सुरू असतानाच डॉ. योगिता होके पाटील यांनी उपनिषदांची व्याख्या समजून घेतल्यानंतर चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका घेत उपराष्ट्रपतींना उपनिषद हे पुस्तक भेट देण्याच्या विद्यापीठ प्रशासनाच्या कृतीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा डॉ. राठोड, प्रा. मगरे, प्रा. सोमवंशी यांच्यासह इतरांनी त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. ज्या पुस्तकात महिलांविषयी अतिशय गलिच्छ भाष्य केलेले आहे, ते पुस्तक भेट देण्याचे समर्थन तुम्ही कसे काय करू शकता? असा रोकडा सवाल त्यांनी केला. त्यामुळे होके पाटलांची चांगलीच अडचण झाल्याचे पहायला मिळाले.
दीक्षांत समारंभात पाहुण्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित ग्रंथ भेट द्यायला हवे होते. परंतु समितीने उपनिषद हा भाषांतरित झालेला ग्रंथ भेट देण्याचा निर्णय घेतला. सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मी माफी मागते आणि या पुढे असा प्रकार घडणार नाही, याची काळजी विद्यापीठ प्रशासन घेईल, असे डॉ. भारती गवळी म्हणाल्या.
दलित असल्यामुळेच प्रकुलगुरूंची अवहेलना
दीक्षांत समारंक्षात प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांना मंचावर बसू देण्यात आले नव्हते. हे दोघेही दलित असल्यामुळेच त्यांची अशी अवहेलना करण्यात आली, असा आरोप प्रा. सुनील मगरे यांनी केला. हा प्रोटोकॉल कुठून आला होता? असा जाबही त्यांनी विचारला. या सर्व प्रकारावर डॉ. भारत खैरनार यांनी निषेधाचा ठराव घेण्याची मागणी केली. डॉ.संजय कांबळे, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. हरिदास सोमवंशी यांनीही बाजू मांडली. शेवटी सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन परीक्षा संचालक डॉ.भावना गवळी यांनी दिलगीरी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. फुलारी यांनी झाले ते झाले आता यापुढे सगळ्यांची व्यवस्था होईल, असेच पाहुणे बोलावण्यात येतील. त्याविषयीची चर्चा व्यवस्थापन परिषदेत करण्यात येईल, असे स्पष्ट करीत वादावर पडदा टाकला.