विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयात तब्बल २१ कोटी ५९ लाखांचा अपहार; संगणक ऑपरेटर व लिपिकाने संगनमताने हडपली रक्कम!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  बनावट कागदपत्रांच्या आधारे छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्याला नेट बँकिंग सुविधा सुरू करून विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालयातील कंत्राटी संगणक ऑपरेटर आणि लिपिकाने तब्बल २१ कोटी ५९ लाख ३८ हजार २८७ रुपयांची रक्कम हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभागीय क्रीडा व युवक सेवा उपसंचालक कार्यालयातील क्रीडा अधिकारी तेजस दीपक कुलकर्णी (वय ३६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या कार्यालयातील कंत्राटी संगणक ऑपरेटर/लिपीक हर्षकुमार अनिल क्षीरसागर (रा. बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर) आणि कंत्राटी लिपीक यशोदा शेट्टी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४), ३१६(५), ३३६(२), ३३६(३), ३३८, २४० (२), ६१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

विभागीय क्रीडा व युवा सेवा उपसंचालक कार्यालयातील संगणक ऑपरेटर/लिपीक हर्षकुमार क्षीरसागर व लिपीक यशोदा शेट्टी यांनी संगनमताने विभागीय क्रीडा संकुल समितीच्या इंडियन बँकेतील बँक खात्यास नेट बँकिंग सुविधा चालू करून घेण्यासाठी क्रीडा उपसंचालक यांचे नाव व स्वाक्षरीचा बनावट वापर केला. कार्यालयीन कामकाजातील जुन्या पत्राशी छेडछाड करून बँकेस खोटे व बनावट मजकुराचे पत्र तयार करून हर्षकुमार क्षीरसागर याने स्वतःच्या मोबाइल क्रमांकावर नेट बँकिग सुविधा सुरू करून घेण्यासाठी बनावट ई-मेल आयडी तयार केला. या बनावट ईमेल आयडीद्वारे विभागीय क्रीडा संकुल समितीच्या नावे असलेल्या बँक खात्यावर नेटबँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी पत्र पाठवले.

ई-मेलद्वारे प्राप्त झालेले पत्र हे विभागीय क्रीडा व युवा सेवा उपसंचालकांची अधिकृत रिक्वेस्ट असल्याचे समजून बँकेनेही हे पत्र प्राप्त होताच विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यावर नेटबँकिंग सुविधा सुरू केली. ही नेट बँकिंग सुविधा सुरू झाल्यानंतर हर्षकुमार क्षीरसागर याने जून ते डिसेंबर २०२४ या सहा महिन्यांच्या काळात विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातील रक्कम आधी स्वतःच्या खात्यात आणि त्यानंतर इतर खात्यात वळती करण्यास सुरुवात केली.

सहा महिन्यांच्या काळात विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातील तब्बल २१ कोटी ५९ लाख ३८ हजार २८७ रुपये रक्कम वळती करून घेऊन अपहार केला आणि शासनाची फसवणूक केली. डिसेंबरमध्ये ही बाब क्रीडा उपसंचालक कार्यालयाच्या लक्षात आल्यानंतर क्रीडा अधिकारी तेजस कुलकर्णी यांनी जवाहरनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या सहायक पोलिस आयुक्तांच्या आदेशाने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकाकडे देण्यात आला आहे.

६ महिने दुर्लक्ष कोणी व का केले?

जून ते डिसेंबर २०२४ या सहा महिन्यांच्या काळात विभागीय क्रीडा व युवा सेवा उपसंचालक कार्यालयातील संगणक ऑपरेटर व लिपीकाने संगनमत करून विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातील तब्बल २१ कोटी ५९ लाख ३८ हजार २८७ रुपये रक्कम वळती करून घेऊन हडपली. विभागीय क्रीडा व युवा सेवा उपसंचालक कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांनी सहा महिन्यात एकदाही या बँक खात्यातील व्यवहाराकडे ढुंकुणही पाहिले नसेल का? पाहिले नसेल तर का पाहिले नाही? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून या अपहारात फक्त संगणक ऑपरेटर/लिपीकाचाच सहभाग आहे की कोणा मोठ्या माश्याच्या सांगण्यावरून हे धाडस केले गेले? हे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर येण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *