मुंबईः भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो दरात कोणती वाढ न करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे व्याजदर जैसे थे राहणार आहेत. त्यामुळे तुमच्या गृहकर्जावरील एमआयआय वाढणार नाही. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज ही माहिती दिली.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक आज संपली. ही बैठक संपल्यानंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने झाल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. विशेष म्हणजे मे २०२२ पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सलग सहावेळा वाढ केली आहे.
रेपो दर कायम ठेवण्यात आल्यामुळे म्हणजेच रेपो दर ६.५ टक्केच राहणार असल्यामुळे तुमच्या कर्जावरील ईएमआय वाढणार नाही. रिझर्व्ह बँकेने ८ फेब्रुवारी २०२३ रोजी आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी रेपो दरात शेवटची वाढ केली होती.
१ एप्रिलपासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षातील पहिली चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक ३ एप्रिल रोजी सुरू झाली होती. देशातील किरकोळ चलनवाढीचा दर जानेवारीमध्ये ६.५२ टक्के आणि फेब्रुवारीमध्ये ६.४४ टक्के होता. हा आकडा रिझर्व्ह बँकेच्या महाई दर २.६ टक्क्यांच्या निश्चित मर्यादेत ठेवण्याच्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे यावेळी रेपो दरात आणखी वाढ होण्याची शक्यता होती. मात्र रिझर्व्ह बँकेने रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.