‘या’ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने घातले निर्बंध, खातेधारकांमध्ये खळबळ; तुमचे खाते आहे का या बँकेत?


मुंबईः बँकिंग क्षेत्राचे नियामक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मुंबईच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर अनेक निर्बंध लादले आहेत. आरबीआयच्या या निर्बंधांमुळे बँकेच्या ठेवीदारांनी त्यांच्या खात्यात जमा केलेले कष्टाचे पैसेही काढता येणार नाहीत. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला आता कोणतेही कर्ज वितरित करता येणार नाही किंवा कोणतीही ठेव घेता येणार नाही. आरबीआयने पुढील सहा महिन्यांसाठी या बँकेवर हे निर्बंध लादले आहेत. त्यामुळे बँकेचे खातेदार आणि ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत अलीकडच्या काळात घडलेल्या काही घडामोडींमुळे ठेवीदारांच्या ठेवींचे रक्षण करण्यासाठी हे निर्बंध लादण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे आरबीआयने म्हटले आहे. बँकेची सध्याची स्थिती लक्षात घेता आरबीआयने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यातून रक्कम काढण्यावरही निर्बंध घातले आहेत.

या निर्बंधांचा अर्थ बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आलेला नाही. आरबीआय बँकेच्या स्थितीवर लक्ष ठेवेल आणि आवश्यकतेनुसार कारवाई करेल, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. बँकेने हे स्पष्टीकरण दिले असले तरी या निर्बंधांमुळे बँकेचे खातेधारक आणि ठेवीदार धास्तावले आहेत.

बँकेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्यामुळे रिझर्व्ह बँकेने गुरूवारी (१३ फेब्रुवारी) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर बँकिंग व्यवसायाशी संबंधित अनेक निर्बंध घातले आहेत. बँकेची सध्याची रोख स्थिती पाहता ठेवीदारांच्या बचत बँक किंवा चालू खात्यातून किंवा इतर कोणत्याही खात्यातून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी असणार नाही. तथापि बँकेला बँकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार, भाडे आणि वीज बिल यासारख्या काही आवश्यक गोष्टींवर खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे आरबीआयने म्हटले आहे.

आरबीआयच्या निर्बंधांनुसार १४ फेब्रुवारीपासून न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला पूर्वमंजुरीशिवाय कोणतेही कर्ज किंवा आगाऊ रक्कम देता येणार नाही. शिवाय या बँकेला आजपासून कोणत्याही ग्राहकांच्या ठेवी स्वीकारता येणार नाहीत किंवा त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची परवानगी असणार नाही.

…पण ही रक्कम मिळणार

आरबीआयने हे निर्बंध घातले असले तरी न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व पात्र ठेवीदारांना त्यांच्या ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा आणि पत हमी महामंडळाकडून ठेव विमा दाव्याची रक्कम मिळवता येईल, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. बँकेत एकापेक्षा जास्त खाती असली आणि वेगवेगळ्या खात्यांमध्ये वेगवेगळे पैसे असले आणि ही रक्कम पाच लाखांपेक्षा जास्त असली तरीही पाच लाख रुपयेच ठेव विमा दाव्याची रक्कम मिळेल, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!