‘रमाई पहाट’द्वारे महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांनी माता रमाईंना दिली आगळीवेगळी मानवंदना, संभाजीनगरातील पहिलाच प्रयोग!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘रमाई पहाट’ कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नामवंत कलाकारांनी त्यांच्या कलेच्या सादरीकरणातून माता रमाई आंबेडकर यांना अभूतपूर्व मानवंदना दिली. छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांचा ७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. त्यानिमित्त  शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि कलाकारांच्या संयुक्त विद्यमाने सिडकोतील कॅनॉट प्लेस येथे आज ‘रमाई पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सामूहिक बुद्ध वंदना आणि समता सैनिक दलाच्या महिला पथकाकडून माता रमाईंना सलामी देण्यात आली. रमाई वंदन गीताने या कार्यक्रमाची सुरूवात झाली.

सारेगम रिऍलिटी शो फेम आंबेडकरी सुफी गायिका आणि भीम शाहीर प्रतापसिंग बोदडे यांच्या कन्या रागिणी बोदडे, ‘तुझ्या रक्तामधला भीमराव पाहु दे’  आणि ‘बापाचा रुबाब आता दिसू लागला पोरात’ फेम गायिका भाग्यश्री इंगळे, ‘काळजावर कोरलं नाव भीमा कोरेगाव’ आणि ‘भीम मोत्याचा हार गं माय’फेम गायक अजय देहाडे, आंबेडकरी गझलकार चेतन चोपडे, ‘काळाच्या कपाळी कोरलं बा भीमाचं नाव’फेम गायक सचिन भुईगळ, ‘मेरा भीम जबरदस्त’ आणि ‘भारत का संविधान’फेम कुणाल वराळे, सुफी गायक विजय पवार, प्रख्यात शास्त्रीय गायिका प्रज्ञा वानखेडे, प्रख्यात आंबेडकरी गायिका निकीता बंड यांनी एकापेक्षा एक बहारदार सादरीकरण करून माता रमाईंना मानवंदना दिली. सुरवाद्य प्रकारात विक्रम पवार यांनी पिंपळाचे पान वाजवून रमाईचे गीत सादर केले. त्यांच्या या लक्षवेधी सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.

छत्रपती संभाजीनगरातील (औरंगाबाद) सिडकोच्या कॅनॉटप्लेसमध्ये आयोजित ‘रमाई पहाट’ कार्यक्रमाला अशी खच्चून गर्दी झाली होती.

रॅप ते फ्लॅश मॉबः अफलातून सादरीकरण

मुंबईचे मराठी रॅपर राज मुंगसे, जे. सुबोध, अजित, गोकू आणि एएक्सएस बॉय यांच्या अफलातून सादरीकरणाने उपस्थितांना रॅपच्या तालावर डोलायला लावले. या आंबेडकरी रॅपर्सनी रॅपच्या माध्यमातून प्रबोधन करून ‘रमाई पहाट’ समृद्ध केली.

अयुप यांच्या नेतृत्वातील नागपूरचा पोट्टा आणि ग्रुपने सादरी केलेल्या आंबेडकरी फ्लॅश मॉबच्या सादरीकरणाला तर उपस्थितांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. अविनाश भारती, अमोल कदम यांनी कविता सादरीकरण केले. कैलासनगरच्या प्रियदर्शी सम्राट अशोक युवामंचचे लेझीम पथक, सुनिल दणके यांच्या नेतृत्वातील कन्नडचा ओमसाई हलगी ग्रुप, मृणाल गजभिये यांच्या नेतृत्वातील धम्मनाद ढोलपथक, डीजे मयूर आणि डीजे एचके स्टाईल यांच्या सादरीकरणाने ‘रमाई पहाट’ कार्यक्रमाला चार चांद लावले. मीनाक्षी बालकमल आणि सद्दाम शेख या जोडगोळीने या कार्यक्रमाचे दिलखेच आणि समर्पक निवेदन केले.

माता रमाई यांच्या जयंतीदिनी ‘रमाई पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना मानवंदना देणारा अशा प्रकारचा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. आंबेडकरी चळवळीचे समन्वयक विजय वाहुळ, प्रसिद्ध गायक अजय देहाडे, सचिन भुईगळ, चेतन चोपडे, कुणाल वराळे, अक्षय जाधव, संदीप वाहुळ आणि रवी वाहुळे यांच्या पुढाकारातून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  आता दरवर्षी होणार ‘रमाई पहाट’चा उषःकाल

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘रमाई पहाट’ कार्यक्रमाच्या आयोजनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. यंदा सिडकोच्या कॅनॉट प्लेसमधून या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. आता दरवर्षी माता रमाई यांच्या जयंतीदिनी ‘रमाई पहाट’ आयोजित करण्यात येणार असून हा कार्यक्रम दरवर्षी शहराच्या विविध भागात आयोजित केला जाणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!