जलसंधारण अधिकारी संवर्गातील  ६७० पदांसाठीची फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेणार


मुंबईः जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीच्या फेरपरीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. ही परीक्षा अधिक पारदर्शक, कोणत्याही तांत्रिक त्रुटींशिवाय पार पडावी असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.

मृद व जलसंधारण विभागाच्या जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब संवर्गातील ६७० पदांसाठीची फेरपरीक्षा आढावा बैठक मंत्रालयमध्ये आयोजित केली होती त्यावेळी राठोड बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, टीसीएस कंपनीचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० पदे सरळसेवेने भरण्यासाठी १९  डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर परीक्षा ही शासन मान्य टीसीएस या कंपनीमार्फत राज्‍यातील २८ जिल्हयातील निश्चित केलेल्या एकूण ६६ केंद्रांवर २० व २१ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आली होती.

या परीक्षेदरम्यान २१ फेब्रुवारी रोजी नांदगाव पेठ, अमरावती शहर येथील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आले. परिक्षार्थी यांनी याबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनेचा विचार करुन  २० व २१ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेली परीक्षा  रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने १५ मार्च २०२४ रोजी घेतला होता.

आता फक्त १० केंद्रावरच परीक्षा

या प्रस्तावित ६७० पदभरतीसाठी संभव्यित १४,  १५ व १६ जुलै २०२४ या कालावधीत फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा अधिक पारदर्शक व्हावी यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या सात शहरांतील एकूण दहा टीसीएस-आयओएन या कंपनीच्या अधिकृत केंद्रावरच घेण्यात येणार आहे.

…तर फौजदारी गुन्हे दाखल करणार

परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र इ. बाबत सर्व उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार आहे. पूर्ण सुरक्षित तंत्रांज्ञानासह जिल्हाधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ही परीक्षा होणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून आल्यास संबंधितास जबाबदार ठरवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असेही मंत्री राठोड यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *