छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील नामवंत कलावंतांच्या वतीने बुधवारी (७ फेब्रुवारी) छत्रपती संभाजीनगरातील (औरंगाबाद) सिडको येथील कॅनॉटप्लेस येथे रमाई पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात ज्वाजल्य सांस्कृतिक कार्यक्रमातून माता रमाई यांना संगीतम अभिवादन करण्यात येणार आहे.
सकाळी ६ ते ११ वाजेदरम्यान होणाऱ्या अभिवादनपर कार्यक्रमात गायन, सुरवादन, कविता, ढोलपथक, लेझीम, हलगी वादन, फ्रेश मॉब, डान्स, रॅप तथा डीजे आदी कलाप्रकार सादर करण्यात येणार आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील ख्यातनाम आंबेडकरी गायक अजय देहाडे, चेतन चोपडे, कुणाल वराळे, रागिणी प्रतापसिंह बोदडे, भाग्यश्री इंगळे, सचिन भुईगळ, विजय पवार, कवी-गीतकार अमोल कदम, धम्मा धनवे, सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार अविनाश भारती, निवेदक तथा मिमिक्री आर्टिस्ट सद्दाम शेख, धम्मनाद ढोल पथक मृणाल गजभिये, नागपूरचे फॅश मॉब ग्रुप अयुब डान्स अकॅडमी, ताल माधुर्य संगीत अकादमीचे विक्रम पवार, मुंबईचा मराठी हिपहॉप रॅपर ग्रुप, एच. के. स्टाईल डीजे तथा सुप्रसिद्ध अँकर मीनाक्षी बालकमल आदी कलावंत त्यांच्या कलेच्या सादरीकरण करून माता रमाईस अभिवादन करणार आहेत.
या कार्यक्रमास संभाजीनगर शहरातील परिवर्तनावादी-बहुजन नागरिकांसह बौद्ध उपासक, उपासिका आणि भीम अनुयायांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहून माता रमाईस अभिवादन करण्याचे आवाहन विजय वाहुळ, सचिन भुईगळ, अजय देहाडे, कुणाल वराळे, चेतन चोपडे, अक्षय जाधव, संदीप वाहुळ यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केले आहे.