मुंबईः तब्बल सातवेळा रेकॉर्डब्रेक मुदतवाढ मिळवल्यामुळे सतत चर्चेत असलेले निवृत्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालकपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले असून त्यांच्या जागी सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव अनिलकुमार गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी गायकवाड यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून ते गुरूवारी सूत्रे स्वीकारणार आहेत.
सर्वच राजकीय पक्षांशी मधुर संबंध असलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार हे २०१७ मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालकपदी रूजू झाले. त्यानंतर ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना फेब्रुवारी २०१८ पासून सलग पाच वर्षे तब्बल सातवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. ठाकरे आणि फडणवीस सरकारच्या कार्यकाळात सलग सातवेळा विक्रमी मुदतवाढ मिळालेले राधेश्याम मोपलवार हे पहिलेच अधिकारी असावेत.
आता राज्य सरकारने राधेश्याम मोपलवार यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालकपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले असून त्यांच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव अनिलकुमार गायकवाड यांची नियुक्ती केली आहे. गायकवाड हे ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवपदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. निवृत्तीपूर्वी त्यांच्याकडे रस्ते विकास महामंडळाच्या सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार होता.
विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आलेले अनिलकुमार गायकवाड हे मराठवाड्यातील आहेत. ते लातूर जिल्ह्यातील आहेत. त्यांचेही सर्व पक्षीयांशी मधुर संबंध आहेत. या पदावर नियुक्ती मिळवणारे गायकवाड हे पहिलेच बिगर सनदी अधिकारी आहेत.
मोपलवार लढवणार नांदेड किंवा हिंगोलीतून लोकसभा?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे राधेश्याम मोपलवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखालील पायाभूत सुविधांशी संबंधित वॉररूमचे सल्लागार आहेत. एमएसआरडीसीच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आल्यानंतर ते आता लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
फडणवीस सरकार, महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकार अशा तिन्ही सरकारच्या काळात राधेश्याम मोपलवार हे सत्ताधाऱ्यांचे विश्वासू ठरले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या काळात मोपलवार यांना कायम स्थान मिळत होते. आता मोपलवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीत ते नांदेड किंवा हिंगोली मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
निवडणूक लढवण्यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून एमएसआरडीसीच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती त्यांनीच सरकारला केली होती, असे सांगण्यात येते. पुढील आठवड्यात सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर ते अन्य सरकारी पदेही सोडणार असल्याचे सांगण्यात येते.