पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा बिल्डर बाप विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक, पुणे पोलिसांची कारवाई


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)/पुणे:  आपल्या अल्पवयीन लेकाकडे अलिशान पोर्शे कारच्या चाव्या दिल्यामुळे त्या कारने चिरडून दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील बडा बिल्डर विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून (औरंगाबाद) अटक केली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली.

पुण्यातील कल्याणीनगर जंक्शन भागात रविवारी पहाटे नंबर प्लेट नसलेल्या अलिशान पोर्शे कारने मोटारसायकलला धडक दिली होती. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. ही धडक इतकी जबर होती की दुचाकीवरील तरूण काही फूट वर उडून जमिनीवर आपटली तर दुचाकीवरील तरूण काही अंतर फटफटत गेला. या अपघातात दोघांच्याही डोक्याला जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. अनिस अहुदिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृतांची नावे आहेत.

या प्रकरणात पोलिसांनी कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक केली होती. मात्र, त्याच्यावर लावण्यात आलेली कलमे जामीनपात्र असल्यामुळे त्याला जामीन देण्यात आला होता. यावरून नागरिकांत मोठा संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर पोलिसांनी कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल व पुण्यातील बडे बिल्डर विशाल अग्रवालवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच विशाल अग्रवाल फरार झाला होता.

 पुणे पोलिसांनी बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवीयन मुलाला पबमध्ये दारू पुरवणाऱ्या मालकासह पब मॅनेजर आणि बार टेंडरवरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला पुण्यातील विशेष हॉलीडे कोर्टाने अवघ्या १२ तासांतच जामीन मंजूर केल्यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली होती.

पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालच्या अटकेसाठी पथके पाठवली होती. त्याचा शोध घेत असताना तो छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आज पहाटे त्याला छत्रपती संभाजीनगरमधून (औरंगाबाद) अटक करण्यात आली. पुणे पोलिस विशाल अग्रवालला घेऊन पुण्यात गेले आहेत. आज विशाल अग्रवालला न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी कुठे पकडले विशाल अग्रवालला?

अलिशान पोर्शे कारची नोंदणीही झालेली नसताना आणि मुलाकडे कार चालवण्याचा परवाना नसतानाही कार दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी बिल्डर विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच विशाल अग्रवाल फरार झाला. फारर झालेल्या विशाल अग्रवालचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची दहा ते बारा पथके त्याच्या मागावर होती.

पुणे, रत्नागिरी, दौंड, रसायनी, शिरूर इत्यादी शहरांत विशाल अग्रवालचा शोध घेण्यात येत होता. अखेरीस विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) दिशेने जात असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने विशाल अग्रवालला गाडीतूनच छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे अटक केली.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!