स्वामित्व योजनेअंतर्गत दिलेले पीआर कार्ड कर्जासाठी वैध दस्ताऐवज!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): स्वामित्व योजनेअंतर्गत देण्यात आलेले मालमत्ता कार्ड (पीआर कार्ड) कर्जासाठी वैध दस्तऐवज असून बॅंकाना या मालमत्ता कार्डच्या आधारे संबंधित मालकास अर्थसहाय्य देता येते. त्यातून ग्रामीण भागातील लोक आपल्या व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकतात. याबाबत बॅंकांनी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज बॅंक अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज जिल्हा सल्लागार व समन्वय समितीची बैठक पार पडली. रिझर्व बॅंकेचे अमितकुमार मिश्रा, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रिय प्रबंधक विवेक नाचणे, नाबार्डचे विभागीय अधिकारी सुरेश पटवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे मनोहर वाडकर, सज्जय जहीर हुसेन, ओबीसी महामंडळाचे व्यवस्थापक जगन्नाथ राठोड, माविमचे समन्वयक चंदनसिंग राठोड, दुग्धविकास अधिकारी मनीषा हराळ मोरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक समाधान सूर्यवंशी, वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापक वैभव घोडके तसेच सर्व बॅंकांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने सैनिक कल्याण निधीसाठी ११ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच महिला बचत गटांतून यशस्वी उद्योजिका कालिंदी जाधव यांनाही सन्मानित करण्यात आले. बैठकीत सर्व क्षेत्रनिहाय बॅंकांमार्फत होत असलेल्या अर्थसहाय्याचा आढावा घेण्यात आला. पीक कर्ज योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, जीवनोन्नती अभियान, कृषी अर्थसहाय्य, पशुपालन व दुग्ध व्यवसाय अर्थ सहाय्य, प्रधानमंत्री विश्वकर्मा अशा विविध योजनांतर्गत अर्थसहाय्याबाबत आढावा घेण्यात आला.

स्वरोजगार व उद्योग करु इच्छिणाऱ्या अर्जदारास बॅंकांनी योग्य ते सहकार्य करुन अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे. आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन घ्यावी. शेती, शेतीपूरक व्यवसाय, दुग्धव्यवसाय, पशुपालन अशा विविध क्षेत्रात अर्थसहाय्य केल्यास त्यातून ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे रोजगार निर्मितीला चालना मिळू शकते, असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

 बॅंक अधिकारी कर्मचाऱ्यांच्याही अडीअडचणी त्यांनी ऐकून घेतल्या. जिल्ह्यातील बॅंक अधिकारी- कर्मचारी यांचे विविध योजनांसंदर्भात एक शिबी घेण्यात यावे व त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार यांनी सादरीकरण केले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!