पुणे: मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक असा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्थापन अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (आर्टी) वतीने विविध स्पर्धा परीक्षा व कौशल्य प्रशिक्षणाचे उपक्रम राबवण्यात येत असून त्यासाठी ऑनलाइन गुगल फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (आर्टी) या संस्थेची नोंदणी पूर्ण झाली असून मातंग समाज आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरिता विविध कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा पूर्व प्रशिक्षण योजना राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी मातंग समाजातील उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षणाचे गुगल फॉर्म भरण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी केले आहे.
उमेदवारांनी गुगल फॉर्म भरल्यानंतर त्यांनी निवडलेल्या कौशल्य प्रशिक्षणानुसार त्यांच्या अर्जाची छाननी करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
जे उमेदवार स्वयंरोजगार करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन गुगल फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. असे वारे यांनी सांगितले.
असे आहेत प्रशिक्षण कोर्सेस
- स्पर्धा परीक्षा: एमपीएससी, यूपीएससी, बॅंक (आयबीपीएस), रेल्वे, जेईई-नीट, यूजीसी- नेट/सेट, पोलिस/ मिलीटरी भरती.
- कौशल्य विकास: परदेशात नोकरी व शिक्षणाची संधी, शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण, हार्डवेअर व सॉफ्टवेअर, तसेच कॉम्प्युटर सर्टिफिकेट संदर्भतील कोर्सेस.
- योजना: पीएच. डी, पोस्ट पीएच.डी संशोधनासाठी अभिछात्रवृत्ती (फेलोशिप)
कसा करायचा अर्ज?
- इच्छुक उमेदवारांनी https://arti.org.in या आर्टीच्या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डवर गुगल लिंक व स्कॅनर देण्यात आले आहे.
- उमेदवारांना गुगल लिंक किंवा स्कॅन करुन संपूर्ण फार्म भरता येईल.