मुंबई: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार (सुपरस्पेशालिटी) रूग्णालयाचे परिचालन आणि व्यवस्थापन शासन आणि खाजगी भागीदारी तत्वावर करण्यात येणार आहे. याद्वारे रूग्णांना शासकीय दरामध्ये उपचार मिळणार आहेत. यासाठी रूग्णालयामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त खाटा महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थींसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मंत्रालयात छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), लातूर आणि नागपूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर चालवण्यासंदर्भात गुरूवारी आयोजित बैठकीत मुश्रीफ बोलत होते.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि लातूर येथे दवाखान्यासाठी इमारत तयार आहे. याठिकाणी रूग्णांना उपचारासोबत अत्याधुनिक निदान सेवा मिळणार आहेत. नागपूर येथील जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून जागा निश्चिती करण्यात येणार आहे. दोन्ही ठिकाणचे दवाखान्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून इमारत आणि वैद्यकीय सामग्री शासन पुरवणार आहे, असे मुश्रीफ म्हणाले.
दोन्ही दवाखाने खाजगी तत्वावर सुरू होणार असले तरी खाजगी रूग्णालयात असलेले शुल्क इथे स्वीकारले जाणार नाही. जनआरोग्यासाठीचे ५० टक्के खाटा पूर्ण झाल्या असले तरी येणाऱ्या रूग्णांना उपचार केले जाणार आहेत. ही भागीदारी १५ वर्षांपर्यंत आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेसोबत राहणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
दवाखान्याजवळच अत्याधुनिक निदान केंद्रांची सोय करावी. एमआरआय, सीटी स्कॅन, पॅथॉलॉजी लॅबही भागीदारी तत्वावर सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ज्याठिकाणी पॅथॉलॉजी नाहीत, तिथे लॅब सुरू करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचनाही मुश्रीफ यांनी दिल्या. यावेळी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या प्रतिनिधींनी सादरीकरणातून माहिती दिली.
यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, संचालक अजय चंदनवाले, अवर सचिव महादेव जोगदंड, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेचे पंकज सिन्हा, हर्षा खूबचंदानी, सुहास पांडे आदी उपस्थित होते.