छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा आणि विद्या परिषदेचे सदस्य डॉ. हरिदास विधाते यांनी शासनाची फसवणूक करून १५ दिवसांच्या तुरुंगातील मुक्काच्या कालावधीचेही तब्बल १ लाख ७३ हजार २०५ रुपये वेतन लाटल्याची धक्कादायक माहिती न्यूजटाऊनच्या हाती आली आहे.
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील बहुचर्चित बेलगाव येथील खंडोबा देवस्थानच्या ५५ एकर जमीन घोटाळा प्रकरणात कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांच्यासह दोन प्राध्यापकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) २१ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री अटक केली होती. २२ सप्टेंबर रोजी त्यांना जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. म्हणजेच प्राचार्य डॉ. विधाते हे २६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. प्राचार्य विधाते हे ४ ऑक्टोबर २०२३ पर्यंत न्यायालयीन कोठडीत होते.
प्राचार्य डॉ. हरिदास गोपीनाथ विधाते यांच्यासह अशोक बाबुराव माळशिखरे आणि बापू सीताराम खैरे यांनी जामिनासाठी बीडच्या विशेष एसीबी न्यायालयात अर्ज केला. त्यावर सुनावणी होऊन बीडच्या विशेष एसीबी न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.एस. पाटील यांनी जामीन अर्ज क्रमांक ९८३/२०२३ मध्ये ४ ऑक्टोबर २०२३ रोजी प्राचार्य डॉ. विधाते आणि अन्य आरोपींना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आणि प्राचार्य डॉ. विधातेंसह अन्य आरोपी तुरुंगाबाहेर आले होते. २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२३ असे पंधरा दिवस डॉ. विधातेंचा तुरुंगात मुक्काम होता.
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) १९७९ च्या कलम ४ मधील तरतुदींनुसार एखादा शासकीय/निमशासकीय कर्मचारी ४८ तास अटकेत राहिल्यास त्याच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई होणे अनिवार्य आहे. परंतु प्राचार्य डॉ. विधाते यांना ज्या कोट्यवधी रुपयांच्या देवस्थान जमीन घोटाळाप्रकरणात अटक झाली, त्याच घोटाळ्यात त्यांच्या महाविद्यालयाचे संस्थाचालक भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे हेही आरोपी आहेत. त्यामुळे प्राचार्य डॉ. विधातेंसह अन्य दोन प्राध्यापकांना अटक होऊन ते ४८ तासांपेक्षा जास्त काळ पोलिस कोठडीत राहिलेले असतानाही संस्थेने या तिघांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली नाही.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्राचार्य डॉ. विधाते यांनी खरे तर महाविद्यालयाच्या हजेरी पुस्तकावर गैरहजेरी नोंदवणे आवश्यक होते. परंतु तसे न करता त्यांनी सप्टेंबर २०२३ चे १० दिवस आणि ऑक्टोबर २०२३ चे चार दिवस महाविद्यलयात हजेरी दाखवली आणि छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) उच्च शिक्षण सहसंचालकांकडे वेतन देयक पाठवून दिले. या दोन महिन्यांचे पंधरा दिवस प्राचार्य डॉ. विधाते यांनी तुरुंगाची हवा खाल्ली असली तरी त्यांनी शासनाची फसवणूक करून या कालावधीतील वेतनापोटी १ लाख ७३ हजार २०५ रुपये लाटले आहेत. याबाबत न्यूजटाऊनने प्राचार्य डॉ. विधाते यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
याच महाविद्यालयातील प्रा. अशोक माळशिखरे, प्रा. बापू खैरे यांनीही अशाच फसवणुकीच्या मार्गाने तुरूंगात हवा खाल्लेल्या कालावधीचे वेतन लाटले. हे दोघेही विधातेंसोबतच तुरूंगात होते.
प्राचार्य डॉ. विधाते यांचे बेसिक वेतन २ लाख १७ हजार रुपये आहे. त्यावर ४६ टक्के महागाई भत्ता लागतो. त्यानुसार प्राचार्य डॉ. विधाते यांना दरदिवसाला ११ हजार ५४७ रुपये वेतन मिळते. शासनाची फसवणूक करून त्यांनी तुरुंगसावाच्या कालावधीत लाटलेल्या वेतनाची रक्कम १ लाख ७३ हजार २०५ रुपये होते.
उच्च शिक्षण सहसंचालक आता काय कारवाई करणार?
प्राचार्य डॉ. विधाते यांनी प्रामाणिकपणा दाखवला असता तर ते तुरुंगसावाच्या कालावधीतील वेतन उचलणे टाळू शकले असते. परंतु ते ‘संघदक्ष’ असल्यामुळे आपले कुणीही काहीच वाकडे करू शकणार नाही, अशा अविर्भावात त्यांनी दिवसाढवळ्या शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून सरकारी तिजोरीला गंडा घातला आहे. आता उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर हे डॉ. विधाते यांनी फसवणुकीच्या मार्गाने लाटलेले वेतन वसूल करून त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.