छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील बहुचर्चित बेलगाव येथील खंडोबा देवस्थानच्या ५५ एकर जमीन घोटाळा प्रकरणात कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांच्यासह दोन प्राध्यापकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रात्री अटक केली असून जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्राचार्य डॉ. विधाते हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य, वाणिज्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विद्या परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे आता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले ‘नैतिक अधःपात’ झालेल्या ‘संघदक्ष’ विधातेंचे सर्व अधिकार मंडळांचे सदस्यत्व निलंबित करतात की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खंडोबा देवस्थानची २२ हेक्टर म्हणजेच ५५ एकर इमान जमीन बेकायदा हस्तांरण प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २९ नोव्हेंबर २०२२ रोजी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, प्रा. अशोक भगवानराव माळशिखरे, आणि प्रा. बापू सीताराम खैरे यांचाही समावेश आहे.
प्राचार्य हरिदास विधाते यांना बुधवारी रात्री उशिरा एसीबीच्या पोलिस अधीक्षकांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली तर प्रा. माळशिखरे आणि प्रा. बापू खैरे यांना कडा येथून ताब्यात घेण्यात आले. बीड येथील जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने या तिघांनाही पाच दिवसांची म्हणजेच २६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सध्या हे तिघेही पोलिस कोठडीची हवा खात आहेत. अटक करण्यात आलेले हे तिघेही भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या ‘आनंद चॅरिटेबल संस्थे’च्या कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय या अशासकीय अनुदानित महाविद्यालयाचे लोकसेवक आहेत.
संस्थेकडून निलंबनाची अपेक्षा गैर, सहसंचालक आदेश देणार का?
प्राचार्य डॉ. विधाते यांना ज्या कोट्यवधी रुपयांच्या देवस्थान जमीन घोटाळाप्रकरणात अटक झाली, त्याच घोटाळ्यात त्यांच्या महाविद्यालयाचे संस्थाचालक भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे हेही आरोपी आहेत. त्यामुळे प्राचार्य डॉ. विधातेंसह अन्य दोन प्राध्यापकांना अटक होऊन ते ४८ तासांपेक्षा जास्त काळ पोलिस कोठडीत राहिलेले असतानाही संस्थेने या तिघांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली नाही. प्राचार्य डॉ. विधाते आणि अन्य दोन प्राध्यापक ज्या महाविद्यालयावर कार्यरत आहेत, हे महाविद्यालय शासन अनुदानित महाविद्यालय असल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरचे विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर तरी नियमाचा बडगा उगारून डॉ. विधाते यांच्यासह अन्य दोन प्राध्यापकांच्या निलंबनाचे आदेश देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
‘संघदक्ष’तेची मिळाली वारंवार बक्षिसी!
प्राचार्य डॉ. हरिदास विधाते हे आरएसएसच्या अत्यंत जवळच्या गोटातले मानले जातात. आरएसएस-भाजप आणि अभाविपपीप्रणित विद्यापीठ विकास मंचमध्येही ते सक्रीय आहेत. प्राचार्य डॉ. विधाते हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर प्राचार्य गणातून निवडून आलेले आहेत. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी त्यांचे वाणिज्य अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून नामांकन केलेले आहे. ते या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही निवडून आले आहेत. त्यामुळे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष या नात्याने ते विद्या परिषदेचे सदस्यही बनले आहेत. विशेष म्हणजे मागच्या वेळी हेच प्राचार्य डॉ. विधाते व्यवस्थापन परिषदेचे सदस्य होते.
३० तारखेला व्यवस्थापन परिषद निवडणूक, कुलगुरू काय करणार?
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम ६४ मध्ये विद्यापीठाच्या कोणत्याही अधिकार मंडळाच्या सदस्यच्या निर्हरतेचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे प्राचार्य डॉ. विधाते यांचे सर्व अधिकार मंडळाचे सदस्यत्व ‘नैतिक अधःपतन’ झाल्याच्या निकषाखाली निलंबित करू शकतात. परंतु प्राचार्य डॉ. विधाते यांची संघाशी असलेली जवळीक पाहता तशा कारवाईची अपेक्षा बाळगणे व्यर्थ असल्याचे काही अधिसभा सदस्यांचे म्हणणे आहे.
येत्या ३० सप्टेंबर रोजी विद्या परिषदेतून व्यवस्थापन परिषदेवर पाठवावयाच्या दोन सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून या निवडणुकीच्या आधीच प्राचार्य डॉ. विधाते यांचे सर्व अधिकार मंडळाचे सदस्यत्व निलंबित झाले तरच ते या निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहू शकतील. अन्यथा ते व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून निवडून गेलेले पहायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये, असेही काही अधिसभा सदस्याचे म्हणणे आहे.