शिंदे गटातील १२ आमदार निघाले होते उद्धव ठाकरेंच्या भेटीला, पण मातोश्रीने….


मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांकडून उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील किमान १२ आमदार उद्धव ठाकरेंशी संपर्क साधू इच्छित असल्याची माहिती पुढे आल्यामुळे शिंदे गटातील अस्वस्थता उजागर झाली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार २७ जुलै रोजी म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी शिंदे गटातील काही आमदार उद्धव ठाकरेंची भेट घेणार होते. उद्धव ठाकरेंना भेटून या आमदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. त्यासाठी संबंधित आमदारांनी मातोश्रीवर फोनही केला होता. परंतु उद्धव ठाकरे यांनीच शिंदे गटातील या आमदारांना भेट नाकारल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीला निघालेल्या शिंदे गटातील आमदारांची संख्या १२ असल्याचे समजते.

उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंना भेटू इच्छित होते, या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु नैतिकतेचे कारण पुढे करून उद्धव ठाकरे यांनीच शिंदे गटातील या आमदारांना भेटण्याचे टाळले, असे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील राजकीय केमिस्ट्रीच बिघडल्याचे सांगितले जाते. त्यातच अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा प्लान असल्याच्या बातम्या अधूनमधून येत आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना अर्थमंत्री असलेले अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधीच देत नाहीत, असा आरोप करून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाहेर पडलेले आमदार आता अजित पवार पुन्हा सरकारमध्ये आल्यामुळे आणि अर्थमंत्री झाल्यामुळे अस्वस्थ झाले आहेत.

सरकारमधील आपले महत्व कमी करण्याचा भाजपकडून पद्धतशीरपणे प्रयत्न केला जात आहे, अशी शिंदे गटातील बहुतांश आमदारांची भावना झाली आहे. मुख्यमंत्री बदलण्याच्या बातम्या अधूनमधून येतच असल्यामुळे शिंदे गटातील आमदारांच्या अस्वस्थेत आणखीच भर पडली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांत गुप्त हालचाली सुरू असल्याचे या वृत्तावरून दिसू लागले आहे.

दुसरीकडे, शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी मात्र या भेटीचे वृत्त फेटाळून लावले आहे. आमच्यापैकी कोणीही उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. या उलट उद्धव ठाकरे गटातीलच १० आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यापैकी सहा आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील. मी आता लगेचच त्यांनी नावे सांगू शकतो. परंतु राजकारणात नैतिकता पाळायची असते, असे उदय सामंत म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *