मुंबईः आपल्या राजकीय डावपेचांचा कुणालाही थांगपत्ता लागू न देणारा नेता अशी ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांचे पेव फुटले आहे. अजित पवार हे आमचेच नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, या शरद पवारांच्या वक्तव्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे अजित पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून त्यांची शिंदे-फडणवीस सरकारबरोबरची वाट आणखी बिकट होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटू लागले आहे.
बारामतीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी केलेले वक्तव्य राजकीय चर्चांना कारण ठरले आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहेतच. त्यात कोणताही वाद नाही. राष्ट्रीय पातळीवर एक मोठा गट वेगळा झाला तर त्याला पक्षात फूट म्हणता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तशी परिस्थिती नाही. कारण काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पण लोकशाही प्रक्रियेत तो त्यांचा अधिकार आहे, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यात संभ्रम कायम राहणार असल्यामुळे कोणत्या गटात जायचे हे त्यांना ठरवताच येणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवारांना संपूर्ण नियंत्रण मिळवणे अवघ होऊन जाईल. तर दुसरीकडे अजित पवार यांची शिंदे-फडणवीस सरकारसोबतची भविष्यातील राजकीय वाटचालही म्हणावी तितकीशी सुकर ठरणार नाही, अशीच शरद पवार यांची खेळी असावी, असा अर्थ यातून राजकीय विश्लेषक काढत आहेत.
अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. निवडणूक आयोगाकडे तसे पत्रही त्यांनी दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या या वक्तव्याकडे पाहिले जात आहे. शरद पवारांना कायद्याच्या लढाईत अडकायचे नाही. शरद पवार म्हणतात काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. पण पक्षात फूट पडलेली नाही. शरद पवारांची ही उत्कृष्ट राजकीय खेळी असू शकते, असे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.
राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली आहे, याबाबत दोन्ही गटात दुमत नाही. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांना वेगळी भूमिका घेतलेल्या नेत्यांविरोधात दहाव्या परिशिष्टानुसार कोणतीही कारवाई करायची इच्छा दिसत नाही, असाही त्याचा आणखी एक अर्थ होतो, असे निकम म्हणाले.
शरद पवार हे मोठे नेते आहेत आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे, हे तेच सांगू शकतील. कदाचित त्यांना पक्षाची काळजी असेल. निवडणूक आयोग आणि न्यायालयात प्रकरण सुरू असताना मी पक्षाचा अध्यक्ष आहे आणि पक्षात फूट नाही, असे सांगणे त्यांच्या रणनितीचा भाग असू शकतो. मात्र, आम्ही त्या खोलात जाण्याचा संबंधच येत नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
शरद पवार यांनी अशाप्रकारचे वक्तव्ये करण्यामागे दोन-तीन कारणे आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात जाऊन वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्या विरोधात पक्षाने अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे आपलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा आहे, असा दावा केला आहे. त्यामुळे आता राजकीयदृष्ट्या विचार केला तर शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहील. भाजप आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्यांमध्ये आणि मतदारांमध्ये अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल संभ्रम कायम राहील. त्यामुळे सरकारमध्ये जम बसवणे अजित पवारांना कठीण जाईल, असे राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी म्हटले आहे.
शरद पवारांचे वक्तव्य आशीर्वाद आहे की राजकीय खेळी? असे पत्रकारांनी अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांना विचारले असता, शरद पवार यांच्या वाक्याचा अर्थ माझ्या दृष्टीने इतकाच निघतो की, पक्षातील बहुतांश लोकांची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्या इच्छेला आशीर्वाद द्यावा, असे आम्ही गेली अनेक दिवस म्हणत होतो. तो आशीर्वाद आम्हाला पुन्हा एकदा देवाकडून मिळाला आहे. याचा अर्थ मी एवढाच घेतो, असे मुंडे म्हणाले.