PET-2024: परीक्षेचा निकाल जाहीर: तुमचा निकाल पाहण्यासाठी या वाचा काही सोप्या ट्रिक्स, निकालावर आक्षेप नोंदवण्याची पद्धत


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या PET-2024 परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ४ जिल्ह्यांतील ११ परीक्षा केंद्रांवर ३ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. ती आता संपुष्टात आली आहे. आज सायंकाळी विद्यापीठाने संकेतस्थळावर विषयनिहाय निकाल जाहीर केला आहे.

विद्यापीठाने जाहीर केलेल्या निकालात विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची आकडेवारी पाहता विद्यापीठाने सर्वच विषयात घेतलेली पेट परीक्षा अत्यंत कठीण होती, हे स्पष्ट झाले आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, मानव्यविद्या, आंतरविद्याशाखा, व वाणिज्य विद्या शाखा अशा चार विद्या शाखांमध्ये एकूण ४४ विषयांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी ११ हजार ४६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार १६६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पीएच.डी. च्या ४९७ संशोधन मार्गदर्शकांकडे आजघडीला केवळ १ हजार ५७६ जागा उपलब्ध आहेत. परिणामी इच्छुकांची संख्या मोठी आणि जागांची संख्या मर्यादित अशी परिस्थिती आहे.

निकाल पाहण्याच्या सोप्या ट्रिक्स

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या https://online.bamu.ac.in/unic/pet-2024/ या संकेतस्थळावर जा. या संकेतस्थळाच्या होमपेजवर असलेल्या तिसऱ्या रकान्यात PET-2024 Results  या पर्यायावरील Click Here येथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला Ph.D. Entrance Test (PET) 2024: Question Paper, Answer Key and Result  या सदराखाली विषयनिहाय निकाल देण्यात आला आहे. या विषयाच्या यादीतून तुम्ही ज्या विषयात परीक्षा दिली आहे, तो विषय निवडा. उजव्या बाजूच्या कोपऱ्यात Result वर क्लिक करा.
  • निकालाची पीडीएफ ओपन होईल. ती सेव्ह करून घ्या. सेव्ह केलेली पीडीएफ ओपन करा. पीडीएफच्या Search ऑप्शनमध्ये जा. सर्च विंडो ओपन झाल्यानंतर तुमचा १६ आकडी सीट नंबर टाका.एन्टर दाबा. तुम्हाला पेट परीक्षेत किती गुण पडले हे तुमच्या सीट नंबर समोर दिसेल.

मार्कमेमो कशी पहाल?

विद्यापीठाच्या  https://online.bamu.ac.in/unic/pet-2024/ या संकेतस्थळावर जा. या संकेतस्थळाच्या होमपेजवर उजव्या कोपऱ्यात हिरव्या रिव्हर्स स्क्रीनमध्ये दिसणाऱ्या Click here to Register या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात दिसणाऱ्या login च्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. तुमचा नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगइन करायचे आहे. Programme Applications   या विंडोमध्ये उजव्या कोपऱ्यात तुम्हाला तुमचा निकाल दिसेल. तो डाऊनलोड करून घ्या.

अशी करा तुम्हाला मिळालेल्या गुणांची पडताळणी

पेट परीक्षेसाठी प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. या प्रश्नपत्रिकेत प्रत्येकी २ गुणांचे एकूण ५० प्रश्न होते. परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी ही प्रश्नपत्रिका देण्यात आली नव्हती. उत्तरपत्रिकेबरोबरच प्रश्नपत्रिकाही जमा करून घेण्यात आली होती. आता पेट परीक्षेच्या निकालाबरोबरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका आणि अन्सर की (Answer Key) अपलोड करण्यात आल्या आहेत.

 तुमच्या विषयाची प्रश्नपत्रिका आणि अन्सर की डाऊनलोड करून घ्या. प्रश्नपत्रिकेची प्रिंटआऊट काढा. सर्वात आगोदर तुम्ही परीक्षेत लिहिलेली उत्तरे आठवून ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. नंतर तुम्ही सोडवलेली उत्तरे दिलेल्या आन्सर कीशी पडताळून पहा आणि तुमची किती उत्तरे चूक आणि किती उत्तरे बरोबर याची खातरजमा करून घ्या.

निकालावर असंतुष्ट? असा नोंदवा आक्षेप

पेट परीक्षेच्या निकालावर तुम्ही असमाधानी आहात? काळजी करू नका. विद्यापीठाने तुम्हाला आक्षेप नोंदवण्याची संधी दिलेली आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरच विषयनिहाय निकालाच्या वरच्या बाजूला PET2024- RESULT GRIVIENCE FORMAT दिलेला आहे. तो डाऊनलोड करून घ्या. त्याची प्रिंटआऊट काढा. सर्व तपशील काळजीपूर्वक भरल्यानंतर तुमचा आक्षेप १०० शब्दात लिहून तो परीक्षा विभागातील पीएच.डी. विभागातील कक्ष अधिकाऱ्याकडे जमा करा. १६ ते २१ ऑक्टोबरदरम्यान तुम्हाला आक्षेप नोंदवता येतील. लक्षात ठेवा तुम्हाला तुमचा आक्षेप नोंदवण्यासाठी केवळ ५ दिवसांचा वेळ आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत तुमचे म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!