मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत गैरप्रकार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील खारघरमधील एका महिलेच्या आधारकार्डचा गैवापर झाल्याचे लक्षात आल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. साताऱ्यातील एका नवरोबाने आपल्या पत्नीच्या नावे एक दोन नव्हे तर तब्बल ३० अर्ज दाखल करून ७८ हजार रुपये उकळल्याचे स्पष्ट झाले आ आहे.
नवी मुंबईच्या खारमधील पूजा प्रसाद महामुनी यांचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नव्हता. त्यामुळे त्यांनी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे तक्रार केली. बाविस्कर यांनी शोध घेतला असता पूजा महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूव्हड झाला असल्याचे निदर्शनास आले.
परंतु पूजा महामुनी यांच्या आधारकार्डला सातारा येथील जाधव नावाच्या व्यक्तीचा मोबाइल नंबर जोडला गेलेला होता. याबाबत अधिक शोध घेतला असता जाधव नावाच्या या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक दोन नव्हे तर तब्बल ३० अर्ज भरल्याचे समोर आले.
विशेष बाब म्हणजे जाधव याने भरलेल्या ३० अर्जांवर २६ वेळा पैसेही त्यांच्या खात्यात जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येकी ३ हजार रुपये याप्रमाणे ही रक्कम ७८ हजार रुपये होते. याबाबतची तक्रार पनवेलच्या तहसीलदाराकडे करण्यात आली असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.
साताऱ्याच्या या नवरोबाने ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत सरकारला गंडा घालण्यासाठी वेगवेगळ्या आधार क्रमांकाचा वापर करून हे ३० अर्ज भरल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने वेगवेगळ्या महिलांचे आधारकार्ड आपल्या मोबाइल नंबरला लिंक करून हा गैरप्रकार केला. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर महिलांच्या आधारकार्डचा गैरवापर करण्यात येत असल्याचेही समोर आले आहे.